भाजपा कार्यकर्त्यामध्ये जल्लोष, मडकईत शांतता
प्रतिनिधी /फोंडा
गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचा शपथविधी सोहळा काल सोमवारी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळात 8 जणांच्या समावेशात सर्वाधिक तीन मंत्रीपदाची लॉटरी फोंडा तालुक्यातील उमेदवारांना लागलेली आहे. त्यामुळे प्रियोळ, फोंडा व शिरोडा मतदारासंघात भाजपा समर्थकांमध्ये जल्लोष सुरू आहे, तर निवडणूकपुर्व काळात आपण किंगमेकर ठरणार अशा पवित्र्यात वावरणाऱया व नंतर भाजपा सरकारला विनाअट पाठिंबा देणाऱया मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांची झोळी मात्र रिकामी राहिल्याने मडकईत शांतता पसरली आहे.
फोंडा तालुक्याला तीन मंत्रीपदे मिळण्य़ाची बहुधा ही पहिलीच वेळ आहे. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधी सोहळय़ाला पंतप्रधान उपस्थित राहणे हे ऐतिहासिक बाब आहे. सुदिन ढवळीकर यांना डॉ. सावंत मंत्रीमंडळात सामावून घेण्याविषयी राज्यभरातून होणारा विरोधाला अखेर यश आल्याचे दिसून आले. मात्र पहिल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारावेळी उरलेल्या 3 जणामध्ये ढवळीकर यांची वर्णी लागल्यास फोंडा तालुक्यातील चारही आमदारांना मंत्रीपदाची लॉटरी लागून राज्यात फोंडा केंद्रस्थानी राहील. आमदार रवी नाईक यांच्या निवासस्थानी भंडारी समाजाचे मातब्बर नेते, ख्रिस्ती, मुस्लीम बांधवांनी भेट देत मंत्रीपदी वर्णी लागल्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच शिरोडा व प्रियोळचे आमदारांना शुभेच्छा व अभिनंदन करण्यासाठी भाजपा मंडळाचे कार्यकारी मंडळ व हिंतचिंकांची निवासस्थानी रेलचेल होती.