नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या तीन दिवसांच्या दिलाशानंतर शनिवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढविण्यात आले आहेत. शनिवारी दिल्लीत पेट्रोल 26 पैशांनी महाग झाले असून दर प्रतिलिटर 91 रुपयांपार पोहोचला आहे. दिल्लीत प्रतिलिटर 91.17 रुपये तर मुंबईत 97.47 रुपये प्रतिलिटर या विक्रमी पातळीवर पेट्रोल दर पोहोचले आहेत. तसेच मुंबईत डिझेल प्रतिलिटर 88.60 रुपये झाले असून हा आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी दर आहे. दिल्लीत डिझेल प्रतिलिटर 81.47 रुपये आहे. कोलकातामध्ये हा दर प्रतिलिटर 84.35 रुपये आहे, तर चेन्नईमध्ये डिझेलचा दर प्रतिलिटर 86.45 रुपये आहे. चालू वर्षात आतापर्यंत पेट्रोलच्या दरात 26 वेळा वाढ झाली आहे. यावषी 1 जानेवारीला दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 83.71 रुपये होती. हाच दर आता 91 रुपयांच्या पुढे गेल्यामुळे दोन महिन्यात पेट्रोल 7 रुपये 46 पैशांनी महागल्याचे दिसत आहे.