प्रतिनिधी /पणजी
मनुष्य जीवनात सात्वकिता वाढण्यासाठी विविध सण-उत्सवांची मांदियाळी ऋषिमुनींनी आपल्याला प्रदान केली आहे. दररोज ज्योतीची उपासना करत बसलेच पाहिजे तेव्हा ही ज्योत आशीर्वाद किंवा तिचे दर्शन या नरजन्मामध्ये प्रदान करेल. यासाठी सदोदित दिव्यांच्या संगतीमध्ये बसा. कारण सर्वांच्या अंतःकरणामध्ये एक आत्मज्योत प्रज्वलित आहे आणि म्हणून सर्वजण जगतो आहोत. त्या आत्मज्योतिकडे सर्वांचे लक्ष गेले पाहिजे. धर्मामध्ये प्रत्येक मंगल कार्याच्या शुभारंभी ज्योत प्रज्वलित करण्याची संकल्पना आपल्या धर्मात लावून दिलेली आहे. कारण तेजा सारखे पवित्र या जगात काहीच नाही. हे आचरण सर्व हिंदू धर्मियांनी आपल्या आचरणामध्ये ठेवलेले आहे. हा उत्सव आनंदाशी निगडीत आहे. एकमेकांना उल्हासित नजरेने पहा, सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन सोशल मिडीयावर आपले विचार प्रकट करा, लोकांना चांगले सुविचार द्या, दुसऱयांविषयी विचार करुन त्याला मदत करा, अशाप्रकारे दीपावली उत्सव सर्वांनी आनंदी आनंदाने साजरा करावा. चला, घरोघरी या दीपावली उत्सवामध्ये दीपोराधना, तजोपासनेतून तेजोमय संस्कृतीचे दर्शन घडवूया आणि आपल्या या सृष्टीला धन्य करुया. दीपावली उत्सवाच्या तेजोमय शुभेच्छा व श्री दत्त पद्मनाभ पीठाचे अनंत आशीर्वाद.
– सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी,पीठाधीश्वर, श्री दत्त पद्मनाभ पीठ – गोवा.