उचगाव सेक्शन ऑफिसरना तुरमुरी ग्रा.पं.वतीने निवेदन : पाण्याविना करपताहेत पिके
वार्ताहर /उचगाव
उचगाव परिसरातील तुरमुरी, बाची, कोनेवाडी, सुळगा, कल्लेहोळ, आंबेवाडी, मण्णूर या भागातील शेतीला पाणीपुरवठा करणाऱया शेतकऱयांच्या मोटारींना वेळेत वीजपुरवठा होत नसल्याने पिके वाळून जात असल्याची तक्रार असंख्य शेतकऱयांनी केली आहे. या संदर्भात तुरमुरी ग्राम पंचायतच्यावतीने नुकतेच उचगाव सेक्शन ऑफिसर यांना निवेदन देऊन शेतकऱयांना मिळणाऱया थ्रीफेज विद्युतपुरवठय़ाचे वेळापत्रक ठरवून जाहीर करावे, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
सध्या उन्हाळय़ाचे दिवस असून उन्हाची तीव्रता वाढत आहे. परिणामी शेतवडीतील पिके पाण्याविना करपून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. शेतवडीमध्ये सध्या ऊस, बटाटा, भाजीपाला, मका, मिरची अशी विविध पिके शेतकरी घेत आहेत.
निवेदनाची दखल घ्यावी
मार्कंडेय नदीमध्ये पाण्याचा साठा आहे. विहिरींमधूनही पाणी आहे. मात्र, थ्रीफेज विद्युतपुरवठा सुरळीत नसल्याने या सर्व पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. यासाठी तातडीने उचगाव सेक्शन ऑफिसरनी दखल घेऊन दिवसभरामध्ये थ्रीफेज विद्युतपुरवठा करावा. रात्रीच्या अंधारात शेतवडीपर्यंत जाणे आणि अंधारात पाणी पिकांना देणे कठीण आहे.
यासाठी दिवसभरात थ्रीफेज विद्युतपुरवठा सुरळीत करून शेतातील पिकांना जीवदान द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. निवेदन देतेवेळी रघुनाथ खांडेकर, सुरेश डोंबले, वामन मेघोचे, नवीन खांडेकर, परशराम जाधव आदी उपस्थित होते.
अधिकाऱयांनी विचार करण्याची गरज

ग्रामीण भागातील शेतकऱयांचा उदरनिर्वाह शेतातील मिळणाऱया पिकांवरच चालतो. ही पिके जगवायची असतील, वाढवायची असतील आणि अधिक उत्पादन काढायचे असेल तर त्यासाठी पाणीपुरवठा ही बाब महत्त्वाची आहे. सध्या उन्हाळय़ाचे दिवस असल्याने पिकांना नियमित पाणीपुरवठा करण्याची नितांत गरज आहे. मात्र, हेस्कॉमकडून विद्युतपुरवठा सुरळीत न केल्याने तसेच दिवसभरामध्ये थ्रीफेज विद्युतपुरवठा होत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पुरुष मंडळी कामानिमित्त बाहेर गेली तर अशा वेळी महिलांना शेतावर जाऊन पिकांना पाणी देण्याची वेळ येते. रात्रीच्या वेळी थ्रीफेज वीज दिली तर रात्री महिलांनी शेतवडीत कसे जावे, याचा विचार अधिकारीवर्गाने करण्याची गरज आहे.
– वैशाली खांडेकर, ग्रा. पं. अध्यक्षा, तुरमुरी