बेंगळूर / प्रतिनिधी
जेडीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष एचडी देवेगौडा यांनी मंगळवारी सांगितले की ते २०२४ मध्ये तुमकुरू येथून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या बैठकीत बोलताना ते म्हणाले, “मी आता ८९ वर्षांचा आहे आणि JD(S) ला वाचवण्यासाठी सगळीकडे फिरत असून मी पुन्हा तुमकुरू येथून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. JD(S) म्हणजे फक्त देवेगौडा आणि एचडी कुमारस्वामी.”
गौडा म्हणाले की, कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्री असताना 25,000 कोटी रुपयांचे कृषी कर्ज माफ केले होते. 2023 च्या निवडणुकीनंतर ते मुख्यमंत्री होतील की नाही हे आत्ताच सांगता येत नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. ते म्हणाले, “काँग्रेस नेते के. एन. राजन्ना निवडणुकीत मला पराभूत केल्याचे सांगत फिरत आहेत. ते आमच्या पक्षात असताना आम्ही त्यांना सर्व संधी दिल्या होत्या. ज्या नेत्यांना आम्ही प्रोत्साहन दिले तेच नेते आता आम्हाला त्रास करत आहेत.”