इंग्लंडच्या खेळाडूंनाही कोरोनाची लागण झाल्याने घेण्यात आला निर्णय
वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द करण्यात आला असल्याचे सोमवारी दोन्ही देशांनी जाहीर केले. द.आफ्रिकेत आलेल्या इंग्लंड संघातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर परस्परसंमतीने दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना सुधारित वेळापत्रकानुसार रविवारी होणार होता. पण इंग्लंड पथकातील दोन सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाल्यानंतर तो सामना रद्द करण्यात आला. ‘क्रिकेट दक्षिण आफ्रिका व इंग्लंड-वेल्स क्रिकेट मंडळ दोघांनी मिळून बेटवे वनडे आंतरराष्ट्रीय मालिका लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे दोन्ही मंडळांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ‘दोन्ही संघांतील खेळाडूंचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य आणि हिताचा विचार करून दोन्ही मंडळांनी संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे,’ असेही त्यात म्हटले आहे.
मालिका रद्द झाली असल्याने आता इंग्लंड संघ एकही वनडे सामना न खेळताच मायदेशी परतणार आहे. केपटाऊनमधील हॉटेलमध्ये दोन्ही संघांचे वास्तव्य होते. तेथेच जैवसुरक्षित नियमावलीचे खेळाडूंकडून उल्लंघन झाल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. गेल्या शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेच्या एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यानंतर हॉटेलच्या स्टाफमधील दोन सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर रविवारी इंग्लंडच्या पथकातील दोघांना व्हायरसची लागण झाली. मात्र त्याबद्दल खात्री असणारा अहवाल मिळालेला नव्हता.
या मालिकेची सुरुवात गेल्या शुक्रवारी केपटाऊनमध्ये होणार होती. पण द.आफ्रिकन खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर खेळाडू मैदानात उतरण्यापूर्वीच तो सामना रद्द करण्यात आला होता. तोच सामना नंतर पार्लमध्ये रविवारी घेण्याचे ठरविण्यात आले होते. पण इंग्लंडच्या कॅम्पमध्येच पॉझिटिव्ह अहवाल आल्याने तो सामनाही रद्द केला गेला आणि आता ही मालिकाच लांबणीवर टाकण्यात आली आहे. याआधी दोन्ही संघांत तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका विनाअडथळा पार पडली होती.