अपर जिल्हाधिकारी थोरवे यांचे आवाहन – प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हय़ात कोरोना संसर्ग मंदावला असला आहे. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी दीपावली सण साजरा करताना गर्दी न करता कोरोनासंदर्भातील नियम पाळून घरगुती स्वरुपात दीपावली साजरी करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी केले आहे.
रविवारी सायंकाळी याबाबत प्रसिध्दीसाठी मार्गदर्शक सुचनांचे पत्रक देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, ब्रेक द चेन अंतर्गंत सध्याची राज्यातील कोरोना स्थिती राज्य शासनाने सुधारित मार्गदर्शक सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार धार्मिक स्थळे खुली करण्यात आलेली असली तरी दीपावली उत्सव हा गर्दी टाळून घरगुती स्वरुपात राहील याची दक्षता घ्यावी.
दीपावलीसाठी खरेदीत करण्यास बाजारपेठेत गर्दी होत असून मार्केटची वेळ वाढवण्यात आलेली असल्याने नागरिकांनी शक्यता गर्दी टाळावी व सामाजिक अंतर, मास्कचा वापर करुन खरेदी करावी. ज्येष्ठ नागरिक, बालके यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच दीपावलीत ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी फटाके फोडू नयेत त्याऐवजी दिव्यांची आरास करुन उत्सव साजरा करावा.
दीपावली पहाट कार्यक्रम आयोजित केल्यास नियमांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच शक्यतर अशा कार्यक्रमांचे ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक माध्यमांद्वारे प्रसारण करावे. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबिरे आयोजित करावी तसेच कोरोना, मलेरिया, डेंग्यू आजारांवर प्रतिबंधक उपाय व स्वच्छतेसाठी जनजागृती करावी. कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी संपलेला नाही. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी थोरवे यांनी केले आहे.