अनेक प्रकल्पांच्या राष्ट्रार्पणाचा कार्यक्रम
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान मोदी तेरवा, अर्थात 25 ऑक्टोबरला आपला मतदारसंघ वाराणसीला भेट देणार आहेत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या भेटीत ते 5,200 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. याशिवाय ते पूर्वांचल भागासाठी नव्या प्रकल्पांची घोषणाही करणार आहेत.
हा त्यांचा गेल्या साडेसात वर्षांमधील 28 वा वाराणसी दौरा आहे. वाराणसी व संपूर्ण पूर्वांचल भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढविण्याचा प्रकल्प, तसेच इतर महामार्ग आणि रिंग रोड प्रकल्पांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

25 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी रखौना राजातालाब ते वाजिदपूर हुरहुवा या 16.98 किलोमीटर लांबीच्या रिंग रोडचे लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर प्रयागराज, भदोही, मिर्झापूर, गाझीपूर, मऊ, आझमगढ आणि जौनपूर येथे जाणाऱया किंवा तेथून येणाऱया वाहनांना वाराणसीमधून जावे लागणार नाही. ही वाहने परस्पर वाराणसीबाहेरुनच जाऊ शकतील. यामुळे वाराणसी शहरात वाहनांची गर्दी कमी होऊन प्रदूषणही नियंत्रणात राहील हा या प्रकल्पाचा लाभ आहे.
गोरखपूर मार्गाचे उद्घाटन
वाराणसी ते गाझीपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या 42.60 किलोमीटर भागाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या मार्गामुळे वाराणसीहून गोरखपूरला जाणे सुलभ होणार आहे. या मार्गाची मागणी गेल्या 50 वर्षांपासून होत आहे. तथापि 2014 नंतरच या मागणीकडे लक्ष देण्यात आले. आता लोक सहजगत्या वाराणसीहून गाझीपूर, मऊ आणि गोरखपूरला जाऊ शकणार आहेत.
बायो गॅस प्रकल्पाचे राष्ट्रार्पण
वाराणसीनजीक शेहनशाहपूर या गावात अडीच टन क्षमतेचा बायो गॅस प्रकल्प उभारण्यात आल्या आहे. या प्रकल्पाचे राष्ट्रार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पातून दिवसाला गाई-म्हशींच्या 90 टन शेणापासून अडीच टन गोबर गॅस बनविला जणार आहे. हे शेण आसपासच्या गावांमधून गोळा केले जाणार आहे. तसेच या गॅसपासून असंख्य घरांचा इंधनाचा प्रश्न सुटणार अशी माहिती देण्यात आली. हा प्रकल्प पंतप्रधान मोदीच्या पुढाकारचे फलित मानला जात आहे.
सर्वात मोठा भाजीबाजार होणार अत्याधुनिक
पूर्वांचल आणि बिहार सीमेवर लालबहादुर शास्त्री फळ आणि भाजीबाजाराचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. या भागात भाज्या आणि फळांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात होते. या बाजारात अत्याधुनिक सोयी आणि तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिले जाणार असून त्याचा लाभ लाखो बागायतदारांना होणार आहे. येथे कृषी उत्पादनांच्या चाचणीची व्यवस्थाही केली गेली आहे.