बेळगाव / प्रतिनिधी
परिवहनच्या बेळगाव विभागाला कोरोनाकाळात तब्बल 110 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी परिवहन खात्याकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी महसूल वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यांतर्गत बससेवा सुरू झाल्यानंतर बसस्थानकातून आगाऊ बुकिंग, मासिक बसपासला सुरुवात करण्यात आली. मात्र, अद्याप या बुकिंगला प्रतिसाद अल्पच असल्याचे पाहायला मिळत आहे.
दररोज एकाच मार्गावरून प्रवास करणाऱया प्रवाशांची आर्थिक बचत व्हावी, सर्वसामान्य जनतेचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी परिवहन मंडळातर्फे सवलतीच्या दरात नोकर व कामगारांना मासिक बसपास उपलब्ध करून दिला जातो. मात्र, कोरोनामुळे बरेच उद्योगधंदे, व्यवसाय बंद झाल्याने बसप्रवास करणाऱया कामगारांची संख्याही घटली आहे. कोरोनाच्या भीतीपोटी काही जण दुचाकीवरून प्रवास करत असल्याने मासिक सर्व्हिस बसपासच्या मागणीत अद्याप वाढ झालेली नाही.
नागरिकांच्या मनातील कोरोनाविषयी असलेली भीती अद्याप कमी झालेली नाही. त्यामुळे बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद थंडाच आहे. सध्या बसस्थानकातून सर्व प्रकारची बससेवा सुरळीत सुरू आहे. त्याचबरोबर बससेवा पूर्ण क्षमतेने धावण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच ई-तिकीट सेवा ऑनलाईन सुरू आहे. मात्र, यालाही प्रवाशांचा प्रतिसाद अल्पच आहे. अनलॉक-4 च्या शिथिलतेनुसार कर्नाटक राज्यासह गोवा व महाराष्ट्रात बसेस धावत आहेत. तरीही प्रवाशांअभावी परिवहनला उद्दिष्टांपासून दूरच राहावे लागत आहे.