नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रात वाहनांच्या विक्रीमध्ये मागील काही दिवसांपासून सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारी महिन्यात कार विक्रीत वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मारुती सुझुकी इंडियाची फेब्रुवारीमध्ये विक्री 11.8 टक्क्यांनी वधारुन 1,64,469 वर राहिली आहे. मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कंपनीने 1,47,110 कार्सची विक्री केली होती. तसेच टाटा मोटर्सची विक्री यादरम्यान 51 टक्क्यांनी वधारली आहे.
मारुती सुझुकीने दिलेल्या माहितीनुसार देशातील विक्री फेब्रुवारीत 11.8 टक्क्यांनी वधारुन 1,52,983 वाहनांवर राहिली, ज्यामध्ये मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये देशातील वाहन विक्री 1,36,849 इतकी झाली. सदर विक्रीत मिनी कारमध्ये अल्टो आणि एस प्रेसोची विक्री 12.9 टक्क्यांनी घटून 23,959 वर राहिली आहे. दुसऱया बाजूला कॉम्पॅक्ट कार सेगमेंटमध्ये स्विफ्ट, सेलेरिया, इग्निस, बलेनो आणि डिझायर यासारख्या कार्सची विक्री 15.3 टक्क्यांनी वधारुन 80,517 वर स्थिरावल्याची माहिती आहे.
मारुतीची निर्यात
निर्यातीमध्ये मारुतीच्या सेडान सियाजची विक्री 40.6 टक्क्यांनी घटून 1,510 इतकी राहिली आहे. जी एक वर्षाच्या तुलनेत 11.9 टक्क्यांनी अधिक राहिल्याची माहिती आहे.