पालिका संचालकांच्या निर्णयाची प्रतिक्षा
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा पालिकेचे उपनगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाचा निकाल लटकून राहिला आहे. या निकालाची तांत्रिक बाजू स्पष्ट होत नसल्याने आपण तो पालिका संचालकांकडे पाठविल्याचे नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर यांनी सांगितले. वीरेंद्र ढवळीकर व भाजपा गटाने बैठकीत ठरावाच्या बाजूने बहुमत सिद्ध न झाल्याने तो बारगळल्याचे म्हटले आहे.
भाजपाचे समर्थक असलेले उपनगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर यांच्याविरुद्ध सत्ताधारी गटातील नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर यांच्यासह आठ नगरसेवकांनी 4 ऑक्टोबर रोजी अविश्वास दाखल केला होता. त्यावर भाजपाच्या नगरसेविका अर्चना डांगी यांनीही स्वाक्षरी केली होती. मात्र काल सोमवारी ठरावावरील चर्चा व मतदानाला डांगी या अनुपस्थित राहिल्याने 7 विरुद्ध शून्य असे मतदान झाले. नगराध्यक्ष कोलवेकर हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. तर मुख्याधिकारी सागर गावडे हे त्यांना साहाय्य करीत होते. ठराव संमत होण्यासाठी आठ जणांचे बहुमत आवश्यक होते. ते नसल्याने हा ठराव बारगळल्याचे भाजपा गटातील नगरसेवकांचे म्हणणे आहे. तर गेल्या आठवडय़ात आपल्या विरोधात अविश्वास ठरावावरील मतदानाला एकही नगरसेवक उपस्थित न राहिल्याने तो बारगळला. मात्र त्यावेळी निर्वाचन अधिकारी अजय गावडे यांनी सुरुवातीला एक व नंतर दुसरा निकाल दिला होता. त्यामुळे या अविश्वास ठरावावरील तांत्रिक बाजू स्पष्ट व्हावी यासाठी आपण पालिका संचालकांकडे निर्णय सोपविल्याचे कोलवेकर यांनी सांगितले.