ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यात वाढत असलेली रुग्ण संख्या लक्षात घेत, सरकारने 15 मे पर्यंत लॉकडाऊन जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली की, बिहारमध्ये 15 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, सहयोगी मंत्रीगण आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर बिहारमध्ये सध्यातरी 15 मे पर्यंत लॉकडाऊन जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मागील आठवड्यात संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. लॉकडाऊनबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना व इतर कामांच्या संदर्भात आज आपत्कालीन व्यवस्थापन गटाला सूचना करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
- उच्च न्यायालयाने फटकारले
कोरोना रुग्णांवर होणाऱ्या उपचारांबाबत सोमवारी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना पाटणा उच्च न्यायालयाने बिहार सरकारला लॉकडाऊन संदर्भात प्रश्न विचारला होता. उच्च न्यायालयाने राज्याच्या महाधिवक्त्यांना राज्य सरकारशी बोलण्यास सांगितले होते. 4 मे पर्यंत लॉकडाउनाबाबत कोणताही निर्णय न घेतल्यास उच्च न्यायालय कठोर निर्णय घेऊ शकते, असेही न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर आज 15 मे पर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.