सुमारे चार लाखाचे नुकसान : रात्रीच्यावेळी इमारत कोसळल्याने जीवितहानी टळली

वार्ताहर /किणये
बेळवट्टी येथील प्राथमिक मराठी शाळेची इमारत कोसळून सुमारे चार लाखाचे नुकसान झाले आहे. सदर घटना मंगळवारी रात्री घडली. रात्रीच्यावेळी इमारत कोसळल्याने मोठा अनर्थ टळला आहे. गावातील शाळेची इमारतच कोसळल्याने शिक्षणप्रेमी नागरिकांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शाळेची इमारत कोसळल्यामुळे शाळा सुरक्षित चालू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना उघडय़ावर बसण्याची वेळ निर्माण झाली आहे. यामुळे पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पावसामुळे इमारत कोसळली
गेल्या दोन-तीन दिवसांपासून तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा पुन्हा जोर वाढला आहे. पावसामुळे बेळवट्टीतील प्राथमिक मराठी शाळेची इमारत कोसळली आहे. यात काही साहित्याचेही नुकसान झाले आहे.
बुधवारी सकाळी मुख्याध्यापक एम. के. नागन्नवर, एसडीएमसी कमिटीचे अध्यक्ष गजानन देसाई, माजी ग्रा. पं. अध्यक्षा वैष्णवी सुतार, इराप्पा चांदिलकर, शामराव पाटील, ता. पं. सदस्य एन. के. नलवडे, कल्लाप्पा मरगाळे, राजू नलवडे, मारुती पाटील, विजय पाटील आदींसह शिक्षकवर्गानी शाळेची पाहणी केली.
पाहणी करून निधी मंजुरीची मागणी
शिक्षण खात्याच्या अधिकाऱयांनी शाळेची पाहणी करून शाळेच्या नवीन इमारतीसाठी त्वरित निधी मंजूर करून द्यावा व गावातील विद्यार्थ्यांची सोय करावी, अशी मागणी एसडीएमसी कमिटी व पालकवर्गातून होत आहे.
या शाळेत सध्या 180 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इतर गावांच्या तलुनेत या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक आहे. यामुळे शाळेच्या इमारतीसाठी सर्व स्तरातून प्रयत्न व्हावेत, अशी मागणी होत आहे.