ओटवणे /प्रतिनिधी-
ग्रामस्थांच्या मागणीनंतर अखेर माडखोल धरणासह ओव्हरफ्लो धबधब्याच्या ठिकाणी अनर्थ टाळण्यासाठी आणि अतिउत्साही पर्यटकांना रोखण्यासाठी लघु पाटबंधारे खात्याच्या वतीने स्थानिक ग्रामस्थाची चौकीदार म्हणून नेमणूक करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई बाबतचे सूचना फलकही लावण्यात आले आहेत.
अतिउत्साही पर्यटकांसह युवकांमुळे या ठिकाणी अनर्थासह दुर्घटना घडून यात बळी जाऊ शकतो. त्यामुळे याची त्वरीत दखल घेऊन आवश्यक त्या सुविधांसह सूचना फलक तात्काळ उभारावेत अशी मागणी माडखोलवासियांच्यावतीने जिल्हा बॅन्जो विकास मंडळाचे अध्यक्ष लखन आडेलकर यांनी केली होती. याची पाटबंधारे खात्याचे उपविभागीय अभियंता संतोष कविटकर यांनी तात्काळ दखल घेत धरणाजवळ सूचना फलक लावून चौकीदाराची नेमणूक केली तसेच दर बुधवार, शनिवार, रविवार या दिवशी धरणाजवळ होमगार्ड, पोलिस, हवालदार याना तैनात ठेवण्याबाबत पोलिस प्रशासनाकडे लेखी पत्राने मागणी केल्याचे श्री कविटकर यांनी सांगितले.