भारतात वैद्यकीय शिक्षण न परवडणारे, जागाही मर्यादित : युक्रेनमधील 33 कॉलेजच्या पदवीला जगभरात मान्यता

सुशांत कुरंगी /बेळगाव
युक्रेन व रशिया या दोन राष्ट्रांमध्ये युद्ध सुरू झाले. यामुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी मायदेशी परतू लागले. या दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली असून, सध्या 18 ते 20 हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत. भारतामध्ये असणारी महागडी शिक्षणपद्धती, वैद्यकीय जागांची कमतरता व आरक्षण यामुळे अधिकतर विद्यार्थी युपेनसह चीन, लंडन येथे शिक्षणासाठी प्राधान्य देत आहेत. त्यामुळे भारत सरकारला वैद्यकीय शिक्षणासाठी विचार करण्याची वेळ आली आहे. युपेनमधील परिस्थिती बिघडत असून प्रत्येक देश आपल्या नागरिकांना मायदेशी बोलावत आहे. भारत सोडून युक्रेनला वैद्यकीय शिक्षण घेण्याची गरज काय? असाही प्रश्न काही महाभाग उपस्थित करीत आहेत. देशातील वैद्यकीय शिक्षणामध्ये असणाऱया त्रुटींमुळे विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात परदेशात जाऊन शिक्षण घेत आहेत. आरक्षणामुळे खुल्या गटातील विद्यार्थ्यांना सरकारी कोटय़ातील जागा मिळत नाहीत.
रॅगिंगचे प्रमाण सर्वात कमी
कोणतेही उच्च शिक्षण घेताना सिनियर विद्यार्थ्यांकडून ज्युनियर विद्यार्थ्यांवर रॅगिंग केले जाते. मध्यंतरीच्या काळात भारतात रॅगिंगचे प्रमाण वाढले होते. यावर राज्य तसेच केंद्र सरकारने कठोर कायदे केल्यामुळे हे प्रमाण कमी झाले. युक्रेन येथे रॅगिंगचे प्रमाण सर्वात कमी असल्यामुळे जगभरातील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतात. संपूर्ण अभ्यासक्रम हा इंग्रजीमधून शिकविला जातो. तर शेवटच्या वर्षात प्रॅक्टिससाठी स्थानिक भाषा शिकविली जाते.
वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करताना आपल्या देशात विद्यार्थ्यांवर विलक्षण ताण असतो. प्रवेश प्रक्रियेसाठी भरावे लागणारे भरमसाट शुल्क, इंटर्नशीप करताना विद्यार्थ्यांना वेठीला धरण्याचे प्रकार, हेतुतः दिली जाणारी रात्रपाळी, पक्षपातीपणा, राजकीय हस्तक्षेप या सर्व प्रकाराने विद्यार्थी वैतागून जातात. त्यामुळे परदेशात जाऊन शिक्षण पूर्ण करणे बरे, अशी मानसिकता केवळ वैद्यकीयच नव्हे तर अन्य शाखांच्या विद्यार्थ्यांमध्येही बळावत आहे.
विद्यार्थ्यांच्या मानाने वैद्यकीय जागा अत्यल्प
भारतामध्ये वैद्यकीय शिक्षणाकडे वळणाऱया विद्यार्थ्यांची संख्या दरवषी वाढत आहे. परंतु त्या मानाने देशभरातील महाविद्यालयांमध्ये जागा उपलब्ध नाहीत. दरवषी अंदाजे 7 ते 8 लाख विद्यार्थी नीट परीक्षेसाठी अर्ज करतात. त्यापैकी केवळ 90 ते 95 हजार विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश मिळतो. त्यामुळे उर्वरित विद्यार्थी मनाला मुरड घालून इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. त्यामुळे यातील बरेचसे विद्यार्थी युक्रेन, लंडन या ठिकणी जाऊन वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत.
बेळगावमधील दोन विद्यार्थिनी युक्रेन येथील बोकोव्हेनिया विद्यापीठामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होत्या. काही दिवसांपूर्वीच त्या भारतात दाखल झाल्या आहेत. यातील एक विद्यार्थिनी येळ्ळूर येथील असून, दुसरी संतिबस्तवाड येथील आहे. या दोन्ही विद्यार्थिनींशी ‘तरुण भारत’च्या प्रतिनिधींनी संवाद साधून भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी का जात आहेत? याविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्दय़ांवर प्रकाश टाकला.
विश्वासार्ह कन्सल्टन्सी आवश्यक
भारतातील अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची भुरळ घातली जाते. परदेशी शिक्षणाच्या नादात अनेकवेळा विद्यार्थ्यांची फसवणूक होते. ज्या विद्यापीठ अथवा महाविद्यालयात प्रवेश घेणार आहे, त्यामध्ये विश्वासार्ह व्यक्ती असणे आवश्यक आहे. बरेच विद्यार्थी चुकीच्या माणसांच्या माध्यमातून परदेशात पोहोचतात. त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजून येते. त्यामुळे परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांनी विश्वासार्ह कन्सल्टन्सीकडूनच परदेशातील शिक्षणाचा प्रवेश घ्यावा.
भारतात वैद्यकीय शिक्षणाचा खर्च न परवडणारा

भारतात वैद्यकीय शिक्षणामध्ये अनेक त्रुटी आहेत. डोनेशन व आरक्षणामुळे सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च परवडणारा नाही. युपेनमध्ये मात्र कमी खर्चात चांगल्या दर्जाचे वैद्यकीय शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थी युपेनमध्ये जाऊन एमबीबीएस पूर्ण करत आहेत. केंद्र सरकारने वैद्यकीय शिक्षणाकडे लक्ष पुरवून वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागा वाढविणे गरजेचे आहे, असे मत ऐश्वर्याने मांडले.
– ऐश्वर्या पाटील (येळ्ळूर)
युपेनने वैद्यकीय शिक्षणामध्ये राखली गुणवत्ता

भ्रष्टाचाराने भारतीय वैद्यकीय शिक्षण पद्धतीला पोखरून काढले आहे. युपेनमध्ये एक विद्यार्थी भारतात येणाऱया वैद्यकीय शिक्षणाच्या खर्चामध्ये तीनवेळा एमबीबीएस पूर्ण करू शकतो. युपेनने वैद्यकीय शिक्षणात गुणवत्ता राखून ठेवल्यामुळे जगाच्या कुठल्याही कोपऱयात विद्यार्थी सेवा बजावू शकतात. त्यामुळे देशातील अनेक विद्यार्थी युपेनमध्ये शिक्षण घेत आहेत. भारत सरकारने वैद्यकीय शिक्षणात बदल केल्यास पुढील पिढीला देशामध्येच शिक्षण घेणे सोयीचे ठरेल, असे फईजा हिने सांगितले.
– फईजा सुबेदार (संतिबस्तवाड)