शेतकऱयांनी दिला पुन्हा इशारा, रस्त्यावरील लढाईबरोबरच न्यायालयीन लढाई लढण्यास सज्ज

प्रतिनिधी /बेळगाव
हलगा-मच्छे बायपासचा खटला न्यायालयात आहे. उच्च न्यायालयाने या रस्त्याबाबत झिरोपॉईंट ठरविण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडे खटला वर्ग केला आहे. त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने झिरोपॉईंटबाबत माहिती दिली नाही. असे असताना या रस्त्याचे काम बेकायदेशीररित्या सुरू करण्यात आले आहे. पोलीस फौजफाटा घेऊन दडपशाही करत या रस्त्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. मात्र आम्ही शेवटपर्यंत या रस्त्याला विरोध करणार असून रस्त्यावरील लढाईबराब्sारच न्यायालयीन लढाईही लढणार असल्याचे शेतकऱयांनी सांगितले आहे.
गुरुवारी हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम मच्छे गावाकडून सुरू करण्यात आले. उभ्या पिकांमध्ये जेसीबी घालून ऊसपीक भुईसपाट करण्यात आले. त्यामुळे शेतकऱयांतून संताप व्यक्त करण्यात आला. ऊस असलेल्या जमीन मालकाच्या मुलांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. एका मुलाने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले तर दुसऱया मुलाने झाडावर चढून जीव देण्याचा इशारा दिला. तरी देखील मुर्दाड असलेल्या प्रशासनाला थोडीशीही दया आली नाही. दमदाटी करत ऊस पिकाचे नुकसान करुन रस्ता करण्यास सुरूवात केली. यावेळी शेतकऱयांनी तीव्र विरोध केला.
=त्यामुळे अनेक शेतकऱयांना, महिला शेतकऱयांना धक्काबुक्की करत ताब्यात घेण्यात आले. त्यानंतरही शेतकऱयांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले होते. मात्र या रस्त्याच्या कामाला जोरदारपणे सुरूवात करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. मात्र त्या बैठकीतून काहीच निष्पन्न झाले नाही.
शुक्रवारीही पोलीस संरक्षणात या रस्त्याचे कामकाज सुरूच ठेवण्यात आले. यावेळी शेतकरी रस्त्याच्या बाजूला बसून निदर्शने करत होते. बेकायदेशीरपणे हा रस्ता केला जात आहे. मात्र आम्ही संबंधितांवर गुन्हा दाखल करणार असून न्यायालयाचा अवमान देखील केला असल्याने हे काम कोणत्याही परिस्थितीत थांबविण्यासाठी लढाई लढणार असल्याचे शेतकऱयांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱयांनी दिली भेट
शुक्रवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी भेट दिली. यावेळी पिकांमध्ये आम्ही जेसीबी घालणार नाही, असे आश्वासन दिले. मात्र या रस्त्याच्या ठिकाणी अनेक शेतकऱयांनी भात पेरणी केली आहे. ते भात जोमात आले आहे. तेव्हा त्या ठिकाणी काय करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूणच शेतकऱयांना सहानभूती दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शेतकरीही त्यांच्या या बोलण्याला भुलले नाहीत. लढाई चालूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.