प्रतिनिधी / बेळगाव
शेतात गांजा पिकवून तो विकण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱयाला डीसीआरबी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याच्यावर दोषारोप दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी या आरोपीला न्यायालयाने दहा वर्षे कठीण शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड सुनावला आहे.
मौलानासाब इमामसाब नदाफ ऊर्फ पिंजार (वय 55, रा. बळवाड, ता. अथणी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. मौलानासाब याने उसामध्ये गांजाचे उत्पादन घेतले होते. ही माहिती डीसीआरबी पोलिसांना मिळाली. दि. 9 जून 2017 रोजी तत्कालीन सीपीआय शंकरगौडा व्ही. पाटील यांनी सकाळी 7 वाजताच बळवाड येथे गांजा पिकविलेल्या शेतात धाड टाकली.
पोलिसांनी 15 किलो वजनाची सात झाडे, तर त्यापूर्वी काढून वाळवून ठेवलेला 24 किलो गांजा जप्त केला. 2 लाख 88 हजार रुपये किमतीचा हा ऐवज जप्त करून पंचनामा केला. त्यानंतर अथणी पोलीस स्थानकामध्ये मौलानासाब याच्यावर अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. त्यानंतर येथील दुसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयामध्ये दोषारोप दाखल करण्यात आले. न्यायालयामध्ये एकूण 8 साक्षी, 28 कागदपत्रे पुरावे आणि मुद्देमाल तपासण्यात आले. त्या ठिकाणी मौलानासाब दोषी आढळला. न्यायाधीश जी. नंजुडय्या यांनी त्याला वरील शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून जी. के. माहुरकर यांनी काम पाहिले आहे