ना. नितीन गडकरी यांचा घोषणा : रांजणी जवळ ड्रायपोर्ट, लॉजीस्टिक व सॅटेलाईट पार्क उभा करू ; नव्या पुणे-बेंगळूर महामार्गाची घोषणा
सांगली प्रतिनिधी
सांगली-पेठ रस्त्यांसाठी येत्या चार महिन्यात निविदा काढू. रांजणीजवळ असलेल्या दोन हजार एकर जागेवर ड्रायपोर्ट, लॉजीस्टिक व सॅटेलाईट पार्क उभा करू. विमान उरलेलं असा सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करू. केंद्र व राज्य सरकार निम्मा-निम्मा खर्च करेल. यामुळे द्राक्षासह शेतीमाल सांगलीतून थेट परदेशात निर्यात होईल. राज्य सरकारने केवळ ही जागा द्यावी जिल्हा समृध्द होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.
दरम्यान सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या दुष्काळी तालुक्यांतून जाणाऱ्या नव्या पुणे-बेंगळूर महामार्गाची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. त्यासाठी ४० हजार कोटी रुपयांची तरतुद केली जाणार असून यामुळे सध्याच्या पुणे-बेंगलोर महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईल असे ते म्हणाले. सांगलीत महामार्ग लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत रत्नागिरी – नागपूर महामार्गांतर्गत सांगली ते सोलापूर दरम्यानच्या बोरगाव ते वाटंबरे आणि सांगली-सोनंद जत या महामार्गांचे लोकार्पण त्यांनी डिजीटल पद्धतीने केले. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार संजय पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, विक्रम सावंत, जयंत आसगावकर, अरुण लाड, अनिल बाबर, मानसिंगराव नाईक, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सुभाष देशमुख, मकरंद देशपांडे, पृथ्वीराज देशमुख, प्राजक्ता कोरे आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, प्रस्तावित पुणे-बेंगळूर महामार्ग खंडाळा, फलटण, खटाव, खानापूर, तासगाव व कवठेमहांकाळ असा होईल. पुण्यात रिंग रोडला जोडला जाईल. यानिमित्ताने मुंबई ते बेंगळूर असा थेट महामार्ग अस्तित्वात येईल. महामार्गांच्या कामावेळी आम्ही स्वखर्चाने शेतकऱ्यांना शेततळी काढून देऊन, तेथील माती, दगड आदी साहित्य महामार्गासाठी वापरु. यानिमित्ताने जलसंधारणाचेही काम होईल. रांजणीजवळ दोन हजार हेक्टर जागा असल्याचे कळते. सरकारने ती जागा मला द्यावी.
तेथे ड्रायपोर्ट, लॉजीस्टिक व सॅटेलाईट पार्क उभा करू. विमान उरलेलं असा सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करू. केंद्र व राज्य सरकार निम्मा-निम्मा खर्च करेल. यामुळे द्राक्षासह शेतीमाल सांगलीतून थेट परदेशात निर्यात होईल. ते म्हणाले, सांगली-पेठ रस्त्याबाबत मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. येत्या चार महिन्यात या रस्त्यांसाठी निविदा काढू. लवकरच काम सुरू होईल.