अत्यावश्यक दुकानांना घरपोच सेवेस परवानगी : वैद्यकीय सेवा, मेडिकल सुरु राहणार
प्रतिनिधी / सातारा :
लॉकडाऊन असूनदेखील सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने दि. 4 ते 10 रोजीपर्यंत लॉकडाऊनचा नव्याने आदेश जाहीर करण्यात आला आहे. मात्र, जुन्याच लॉकडाऊनला कडकचा मुलामा देण्यात आलेला असून, यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने, कृषी, हॉटेल, रेस्टारंट व मद्यविक्री सकाळी 7 ते 11 या वेळेत घरपोच देण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, दुकाने बंदच राहतील असे आदेशात म्हटले आहे.
ब्रेक द चेन अंतर्गत 4 मे पासून 10 मे पर्यंत जिल्हादंडाधिकारी यांनी सुधारित आदेश सोमवारी सायंकाळी जारी केले आहेत. यामध्ये त्यांनी किराणा, फळे, भाजीपाला, बेकरी, डेअरी, मिठाई, खाद्य पदार्थ दुकानें बंद राहतील असे म्हटले आहे. मात्र, सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांसह), पाळीव प्राण्यांच्या खाद्य पदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पुर्णपणे बंद राहतील. तथापि, या दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील, असेही नमूद केलेले आहे.
कृषी अवजारे व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या कालावधीतच चालू राहतील. तथापि, सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील. हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खादय पदार्थ विक्री दुकाने यांची घरपोच पार्सल सेवा दुपारी 12.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यतच सुरू राहतील. तसेच त्यासंबंधित इतर बाबींना दि. 14 एप्रिल 21 रोजीचे आदेश लागू राहतील.
घरपोच मद्य विक्री बाबत दि. 20/04/2021 रोजीच्या आदेशामध्ये नमूद कालावधीमध्ये दुपारी 12.00 ते सायंकाळी 05.00 असा बदल करणेत येत असून या आदेशातील इतर सर्व बाबी कायम राहतील. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही, आदेशात नमूद करण्यात आले आहे.