धूम्रपान करण्याचे प्रमाण 63.68 टक्के : नियंत्रणासाठी सरकारने कठोर पावले उचलण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
सावधान! राज्यात धूम्रपानाचे प्रमाण झपाटय़ाने वाढले आहे. याबद्दल तज्ञांनी चिंता व्यक्त केली असून सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन केले आहे. देशातील सहा राज्यांमध्ये म्हणजेच आसाम, गुजरात, ओडिसा, उत्तरप्रदेश व जम्मू काश्मीर यांच्यामध्ये कर्नाटकाचाही समावेश झाला आहे. धूम्रपान करण्याचे प्रमाण 63.68 टक्के असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलण्याची गरज तज्ञांनी व्यक्त केली आहे.
आशियामध्ये आरोग्य, लिंग समानता व कामगार या विषयांवर काम करणाऱया ए. एफ. डेव्हल्पमेंट केअर या संस्थेने केलेल्या सर्व्हेमधून हा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे. शहरी भागात धूम्रपान करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून शहरात 58 टक्के लोक धूम्रपान करतात तर ग्रामीण भागात हे प्रमाण 43 टक्के आहे.
राज्यात 18 वर्षांवरील तरुणांचे धूम्रपान करण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. खेदाची बाब म्हणजे सहा राज्यांमध्ये कर्नाटकातील तरुण सर्वाधिक धूम्रपान करतात. राज्यात तरुणांच्या धूम्रपानाचे प्रमाण 63.68 टक्के आहे. शिवाय बिडी ओढणाऱयांचे प्रमाणही राज्यात अधिक आहे.
जानेवारी ते एप्रिल 2021 दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणीच नव्हे तर अंतर्गत (इनडोअर) विभागातसुद्धा धूम्रपान चालू शकते, अशी कर्नाटकच्या नागरिकांची मानसिकता आहे. राज्यात हे प्रमाण 53.64 इतके आहे. ज्यावर सरकारने तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे संस्थेच्या संचालक साची सत्यपथी यांनी म्हटले आहे. तरुणाईला सहजपणे तंबाखू व तत्सम पदार्थ उपलब्ध होणे ही चिंताजनक बाब आहे. तरुणाईच्या यकृत, हृदय यावर तंबाखूचा गंभीर परिणाम होत आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला बंदी असली तरी तो कायदा केवळ कागदावर आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने याबाबत कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, असे साची यांनी स्पष्ट केले आहे.