वारणा कापशी / वार्ताहर
शाहूवाडी तालुक्यातील सावे येथील एका 55 वर्षीय नराधमाने अंगणात खेळत असणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. या पीडित मुलीवर वैद्यकीय उपचार सुरू असून आरोपी नराधम यशवंत बापू नलवडे यास पोलिसांनी अटक केलेली आहे. या प्रकरणानंतर जनतेतून संताप व्यक्त होत असून पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघाचे आमदार विनय कोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे.
या पत्रामध्ये पुढे असा उल्लेख केला आहे, की सदरच्या घटनेमुळे सावे गावासह संपूर्ण शाहुवाडी तालुक्यातील जनता सुन्न झाली आहे . जनतेत प्रचंड असंतोष माजला आहे . या घटनेनंतर सावे गावातील महिलांनी शाहूवाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा देखील काढलेला होता. शाहू महाराजांच्या नावाने व शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शाहूवाडी तालुक्यातील ही घटना अतिशय संतापजनक व लाजिरवाणी आहे. या भूमीत तीन वर्षाच्या मुलीवर पाशवी लैंगिक अत्याचार घडावेत ही घटना लांच्छनास्पद आहे. सदरचा ज्वलंत खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा होईपर्यंत सरकारी वकील म्हणून प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी ही विनंती, असा उल्लेख पत्रांमध्ये केलेला आहे. सदर आशयाचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही देण्यात आलेले आहे.