वृत्तसंस्था/ पॅरिस
सेव्हिला आणि बायर लिव्हरकुसेन या दोन्ही फुटबॉल क्लबनी युरोपा लिग फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आपला प्रवेश निश्चित केला आहे. गुरुवारी झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सेव्हिला एसी रोमाचा पराभव केला. तर दुसऱया एका सामन्यात बायर लिव्हरकुसेनने रेंजर्सवर निसटता विजय मिळविला.
गुरुवारी झालेल्या सामन्यात सेव्हिलाने वेगवान आणि आक्रमक खेळावर अधिक भर दिला होता. सेव्हिलाने एसी रोमाचा 2-0 अशा गोलफरकाने फडशा पाडला. सेव्हिलातर्फे 22 व्या मिनिटाला बचावफळीतील सर्जिओने पहिला गोल नोंदविला. तर मध्यंतराला काही सेकंद बाकी असताना युसेफ निसेरीने सेव्हिलाचा दुसरा गोल केला. मध्यंतरापर्यंत सेव्हिलाने 2-0 अशी आघाडी मिळविली होती. सामन्याच्या उत्तरार्धात दोन्ही संघांकडून गोल नोंदविला गेला नाही. आता सेव्हिलाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना ऑलिम्पियाकोस आणि उल्व्हेरहॅम्पटन यांच्यातील विजयी संघाबरोबर होईल. सेव्हिलाने आतापर्यंत पाचवेळा युरोपा लिग फुटबॉल स्पर्धा जिंकली असून आता ते विक्रमी सहाव्यांदा जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाले आहेत.
दुसऱया एका सामन्यात बायर लिव्हरकुसेनने रेंजर्सचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव करत युरोपा लिग फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या सामन्यातील एकमेव निर्णायक गोल लिव्हरकुसेनच्या मोसा दिबायने नोंदविला. बायर लिव्हरकुसेनने रेंजर्सबरोबरची लढत 4-1 अशा सरासरी फरकाने जिंकून शेवटच्या आठ संघात स्थान मिळविले आहे. आता बायर लिव्हरकुसेनचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना येत्या सोमवारी इंटरमिलान संघाबरोबर होणार आहे.