मुंबई/प्रतिनिधी
आयकर विभागाने बुधवारी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद संबंधित ६ मालमत्तांचे सर्वेक्षण केले होते. ज्यात त्याच्या धर्मादाय कार्यालयाचा समावेश आहे. त्यानंतर पुन्हा गुरुवारी आणि शुक्रवारीही आयकर विभागाचे काही अधिकाऱ्यांनी पुन्हा सोनू सूदच्या मुंबईतील घरी जाऊन चौकशी केली. आता आयकर विभागाने अभिनेता सोनू सूदने २० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर चुकवला आहे, असं आज एका निवेदनात म्हटलंय. आयकर विभागाने सलग तीन दिवस त्याच्या मुंबईच्या घरी जाऊन यासंदर्भात शोध घेतला होता. सोनूने परदेशी देणगीदारांकडून क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून २.१ कोटी रुपये गोळा केले असून परदेशी योगदान (नियमन) कायद्याचे उल्लंघन केले आहे, असंही आयकर विभागाकडून सांगण्यात आलंय.
अभिनेता सोनू सूदच्या घरी चौकशी केल्यांनतर आयकर विभागाला “अभिनेता आणि त्याच्या सहकाऱ्यांची मालमत्ता असलेल्या परिसरात शोध सुरू असताना, करचुकवेगिरीचे पुरावे सापडले आहेत. अनेक बोगस घटकांकडून असुरक्षित कर्जाच्या रूपात सोनूने त्याच्या बेहिशेबी उत्पन्नाचा मार्ग काढला होता. आतापर्यंतच्या तपासात अशा २० नोंदींचा वापर केल्याचं उघड झालंय. तसेच संबंधित सर्वांनीचं बोगस नोंदी दिल्याची बाब स्वीकारली आहे. त्यांनी रोख रकमेच्या बदल्यात चेक दिल्याचंही मान्य केलंय. तसेच कर चुकवण्याच्या हेतूने खात्यांच्या पुस्तकात कर्ज म्हणून व्यावसायिक पावत्या छापल्या गेल्या असून त्याचा वापर गुंतवणूक करण्यासाठी आणि मालमत्ता घेण्यासाठी केला गेला आहे. आतापर्यंत एकूण २० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर अशा पद्धतीने चुकवला आहे,” असे आयकर विभागाने सांगितले.