कर्नाटक-महाराष्ट्रातील भाविकांची उपस्थिती : यात्रेच्या मुख्यदिवशी विविध कार्यक्रम : भंडाऱयाची उधळण, चांगभलंचा गजर

वार्ताहर /कोगनोळी
हालसिद्धनाथांच्या नावानं चांगभलं।़।़।़ चा गजर, भंडाऱयाची उधळण, धनगरी ढोल वादनाचा ठेका, देवाच्या दर्शनाची ओढ अन् भाकणुकीची उत्सुकता अनुभवताना आप्पाचीवाडी-कुर्ली येथील हालसिद्धनाथांची यात्रा मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. शुक्रवारी यात्रेचा मुख्य दिवस साजरा करण्यात आला. कर्नाटक-महाराष्ट्रातून आलेल्या लाखो भाविकांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेताना देवाच्या चरणी माथा टेकवला. लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे मंदिर परिसरात गर्दी झाली होती. तर भंडाऱयाच्या उधळणीमुळे परिसर पिवळाधमक झाला झाला होता.
शुक्रवारी हालसिद्धनाथ यात्रेचा मुख्य दिवस असल्याने कर्नाटक-महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून लाखो भाविक दाखल झाले होते. त्यामुळे सर्वत्र गर्दीचा महापूर दिसून येत होता. यात्रेनिमित्त श्रींची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. ठिकठिकाणी वालंगाचा कार्यक्रम भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी जोल्ले उद्योग समूहातर्फे 55 स्वयंसेवकांचे पथक कार्यरत आहे. तर यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार यांच्या नेतृत्वाखाली मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
सौंदलगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे मोफत आरोग्य सेवा देण्यात येत आहे. भाविकांसाठी कोल्हापूर, कागल, निपाणी, चिकोडी, रायबाग, गारगोटी व संकेश्वर येथून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. यात्रेच्या चौथ्या दिवशी पुजारी व मानकऱयांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. यानिमित्त महानैवेद्य, मानाचे व नवसाचे अभिषेक तसेच दंडवत कार्यक्रम झाला. रात्री ढोलवादन व पालखी सबिना कार्यक्रम पार पडला.
गेल्या चार दिवसांपासून मानकरी, पुजारी, यात्रा कमिटी व गावकऱयांच्या उपस्थितीत धार्मिक विधी सुरू आहे. प्रमुख मानकऱयांसह यात्रास्थळी आगमन झाल्यानंतर मान, पान व धार्मिक विधी पार पडले. खडक मंदिर येथे रात्री ढोलवादन व हेडाम खेळण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी सबिना सोहळा व पालखी प्रदक्षिणा पार पडली. शुक्रवारी पहाटे सिद्धार्थ डोणे महाराज यांनी पहिली भाकणूक कथन केली.
शुक्रवारी नैवेद्य देण्यासाठी भाविकांनी मंदिर परिसरात मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. सर्वत्र चैतन्याचे व आनंदाचे वातावरण पसरले होते.