ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विधानसभा, लोकसभा आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावर गोंदियात राष्ट्रवादीला खिंडार पडलं आहे. दोन नगराध्यक्षांसह 15 नगरसेवक आणि शेकडो कार्यकत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे गटाची गोंदियातील ताकद वाढली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. सडक अर्जुनी नगर पंचायतचे नगराध्यक्ष डॉ. चंद्रिकापुरे आणि नगरपंचायतमधील 15 नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहे. दोन बांधकाम सभापती आणि बाकी वॉर्ड सदस्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे यांनी या सर्वांच्या अंगावर भगवा शेला टाकत त्यांचे पक्षात स्वागत केले.
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील विकासासाठी आम्ही शिंदे गटात प्रवेश केला आहे. विदर्भ हे मागास क्षेत्र आहे. आम्हाच्या भागात निधी डावलला जातो. त्यामुळे या भागाचा विकास व्हावा म्हणून आम्ही शिंदे गटात आलोय, असं यावेळी डॉ. चंद्रिकापुरे यांनी सांगितले.