रोमांचक उपांत्य लढतीत अफगाणवर 15 धावांनी विजय
वृत्तसंस्था/ नॉर्थ साऊंड
अतिशय रोमांचक ठरलेल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडच्या युवा संघाने अखेरच्या टप्प्यात संयमी खेळ करीत अफगाणिस्तानवर डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे 15 धावांनी विजय मिळविला आणि 24 वर्षांनंतर प्रथमच यू-19 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजयी संघाशी त्यांची जेतेपदासाठी लढत होईल. इंग्लंडच्या जॉर्ज बेलला (67 चेंडूत 56 धावा) सामनावीराचा बहुमान मिळाला. 1998 मध्ये इंग्लंडने ही स्पर्धा जिंकली होती.
इंग्लंडच्या तिघांनी अर्धशतके झळकवली असली तरी फिरकी गोलंदाज रेहान अहमद हा इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला. 46 व्या षटकात त्याने तीन बळी मिळवित सामना इंग्लंडच्या बाजूने फिरविला. यावेळी अफगाणला विजयासाठी शेवटच्या 10 चेंडूत 18 धावांची गरज असताना रेहानने सामन्याला कलाटणी दिली. दोन वर्षापूर्वी झालेल्या या स्पर्धेत इंग्लंडला नववे स्थान मिळाले होते. अफगाणला आता तिसऱया स्थानासाठी लढत द्यावी लागेल. पावसामुळे या सामन्याला उशिरा सुरुवात झाली होती.
इंग्लंडने प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर त्यांची चांगली सुरुवात झाली नाही. या स्पर्धेत आतापर्यंत चमकदार प्रदर्शन करणारा जेकब बेथेलला नावीद झद्रनने 2 धावांवर पायचीत केले. नंतर कर्णधार प्रेस्टही 17 धावा काढून बाद झाला तेव्हा इंग्लंडची स्थिती 2 बाद 56 अशी झाली. सलामीवीर जॉर्ज थॉमसने अर्धशतकी खेळी करीत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अर्धशतक पूर्ण झाल्यावर तो बाद झाला. नंतर विल्यम लक्सटनही लवकर बाद झाल्यानंतर इंग्लंडची स्थिती 5 बाद 106 अशी झाली. यावेळी पावसाचा पुन्हा व्यत्यय आल्याने अर्धा तास खेळ थांबवावा लागला होता. पाऊस थांबल्यानंतर 47 षटकांचा सामना घेण्याचे ठरले. इंग्लंडच्या सातव्या जोडीने चमक दाखवत संघाला निर्धारित षटकांत सव्वादोनशेची मजल मारून दिली. जॉर्ज बेल (नाबाद 56) व ऍलेक्स हॉर्टन (36 चेंडूत नाबाद 53) यांची 95 धावांची भागीदारी मोलाची ठरली. दोघांनी अफगाण गोलंदाजांवर आक्रमण करीत संघाला 6 बाद 231 धावांची मजल गाठून दिली.
अफगाणला पहिल्यांदाच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळाली होती. त्यासाठी चांगली सुरुवात होणे गरजेचे होते. पण एन. खारोटे तिसऱयाच चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्याच्या जागी आलेल्या 18 वर्षीय अल्लाह नूरने षटकाराने सुरुवात करीत शानदार खेळी केली. त्याने 5 चौकार, 3 षटकारांसह 87 चेंडूत 60 धावा फटकावत अफगाणचे आव्हान जिवंत ठेवताना मोहम्मद इशाकसमवेत 93 धावांची भागीदारी केली. इशाक (43) धावचीत झाल्यानंतर कर्णधार सफी शून्यावर बाद झाला. 44 व्या षटकांत अब्दुल हदीने 2 चौकार, एक षटकार ठोकत संघाला दोनशेची मजल मारून दिली. पण रेहान अहमदने 46 व्या षटकात 3 बळी घेत अफगाणला बॅकफूटवर नेल्यानंतर शेवटच्या षटकात त्यांना 18 धावांची गरज होती. पण बॉयडेनने पहिले तीन चेंडू निर्धाव टाकले आणि नंतरच्या दोन चेंडूवर अफगाणला फक्त 2 धावा काढता आल्याने इंग्लंडने हा सामना 15 धावांनी जिंकला. रेहानने 41 धावांत 4, थॉमस अस्पिनवॉलने 2 बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक ः यू-19 इंग्लंड 47 षटकांत 6 बाद 231 ः जॉर्ज थॉमस 50, टॉम प्रेस्ट 17, जेम्स ऱयू 12, जॉर्ज बेल नाबाद 56, रेहान अहमद 16, ऍलेक्स हॉर्टन नाबाद 53 (36 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), अवांतर 14. गोलंदाजी ः नवीद झद्रन 2-67, नूर अहमद 2-37, इझहारुलहक नावीद 1-37, नांगेयालिया खारोटे 1-25). यू-19 अफगाण 47 षटकांत 9 बाद 9 बाद 215 ः मोहम्मद इशाक 43, अल्लाह नूर 60, अब्दुल हदी नाबाद 37, बिलाल अहमद 33, नूर अहमद 25, अवांतर 12. गोलंदाजी ः रेहान अहमद 4-41, अस्पिनवॉल 2-37, बॉयडन 1-23, टॉम पेस्ट 1-23.