नासाकडून एकूण 18 कंपन्यांना प्रदान : जगभरात 60,51,779 कोरोनबाधित : 3 लाख 67 हजार 287 बळी
जगभरात आतापर्यंत 60 लाख 51 हजार 779 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 26 लाख 75 हजार 161 बाधितांनी कोरोनाच्या संसर्गावर मात केली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 3 लाख 67 हजार 287 वर पोहोचला आहे. नासाने 3 भारतीय कंपन्यांसमवेत 18 कंपन्यांना व्हेंटिलेटर निर्मितीचा परवाना प्रदान केला आहे. यात अमेरिकेच्या 8 आणि ब्राझीलच्या 3 कंपन्या सामील आहेत. तर 3 भारतीय कंपन्यांमध्ये अल्फा डिझाइन टेक्नॉलॉजीज, भारत फोर्ड लिमिटेड आणि मेधा सर्नो ड्राइव्स लिमिटेड यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे भारतातील निर्मितीप्रक्रियेला मोठा वेग मिळणार आहे.
रशियात 8,952 नवे रुग्ण

रशियात मागील 24 तासांत 8,952 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर दिवसभरात 181 जणांना जीव गमवावा लागला आहे. रशियात आतापर्यंत 3,96,575 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. अमेरिका आणि ब्राझीलनंतर रशिया तिसऱया क्रमांकाचा कोरोना पीडित देश ठरला आहे. रशियात रुग्णसंख्या अधिक असली तरीही अन्य देशांच्या तुलनेत मृत्युदर कमी आहे. राजधानी मॉस्कोमध्येच सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
प्रार्थनास्थळे खुली

तुर्कस्तानात 2 महिन्यांच्या कालावधीनंतर मशिदींमध्ये सामूहिक प्रार्थना करण्यात आली आहे. तेथील सरकारने मे महिन्यात निर्बंध शिथिल करण्याचे सत्र आरंभिले आहे. देशात सलून, मॉल आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. अध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगान यांनी सोमवारपासून रेस्टॉरंट, कॅफे, लायब्ररी, समुद्र किनारे खुले केले जाणार असल्याची माहिती दिली आहे. संसर्ग काही प्रमाणात घटल्याने आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी झाला आहे.
ब्राझीलमध्ये 1,124 बळी

ब्राझीलमध्ये कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत 27 हजार 944 जण दगावले आहेत. हा आकडा स्पेनपेक्षा (27,121) अधिक आहे. ब्राझीलमध्ये एका दिवसात 1,124 जणांनी जीव गमावला आहे. अमेरिकेनंतर ब्राझील हा कोरोनाचा दुसऱया क्रमांकाचा पीडित देश ठरला आहे. तेथे कोरोना बाधितांचे प्रमाण 27,944 वर पोहोचले आहे. ब्राझीलमध्ये येणाऱया अमेझॉनच्या जंगलात वास्तव्य करणाऱया आदिवासींमध्येही हा संसर्ग पोहोचल्याने चिंता व्यक्त होत आहे.
जर्मनीत 738 नवे रुग्ण

जर्मनीत दिवसभरात 738 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर रुग्णांचा एकूण आकडा आता 1,83,019 झाला आहे. तर दिवसभरात जर्मनीत 39 जणांना कोरोना संसर्गामुळे जीव गमवावा लागला आहे. देशातील बळींचा आकडा आता 8,594 वर पोहोचला आहे. तर देशात 1 लाख 64 हजार 900 जणांनी संसर्गावर मात करण्यास यश मिळविले आहे. जर्मनीत निर्बंध शिथिल करण्यात आल्याने आर्थिक व्यवहारांना गती मिळाली आहे.
पेरू : 1.48 लाख बाधित

पेरू या देशामध्ये मागील 24 तासांत 6,506 नवे बाधित सापडले आहेत. तेथे आतार्पंत 1 लाख 48 हजार 285 रुग्ण आढळले आहेत. देशात दिवसभरात 131 जण कोरोना संसर्गामुळे दगावले आहेत. पेरूमधील कोरोनाबळींचे प्रमाण 4,230 झाले आहे. दक्षिण अमेरिका खंडात ब्राझीलनंतर पेरूमध्येच सर्वाधिक कोरोना संकट दिसून येत आहे. पेरूमधील आरोग्य व्यवस्थेवर वाढलेल्या रुग्णांमुळे मोठा ताण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
अमेरिका : दिवसात 1,225 बळी

अमेरिकेत मागील 24 तासांत 1,225 जणांचा मृत्यू झाला आहे. तेथील कोरोना बळींचा आकडा 1,04,542 वर पोहोचला आहे. न्यूयॉर्क प्रांत 8 जूनपासून खुला केला जाणार आहे. बांधकाम आणि निर्मिती क्षेत्र सुरू केल्याने सुमारे 4 लाख लोक कामावर परतणार आहेत. प्रांतातील बसेस आणि रेल्वेंची दररोज स्वच्छता केली जाणार आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा लोकांसाठी अत्यंत सुरक्षित राहणार असल्याचा दावा गव्हर्नर ऍन्ड्रय़ू क्यूमो यांनी केला आहे. तर वॉशिंग्टमध्ये तीन महिन्यांपासून लागू स्टे-ऍट-होम आदेश 31 मे पासून हटविण्यात येणार आहे.
चीन : 4 रुग्ण
चीनमध्ये दिवसभरात कोरोना संसर्गाचे 4 नवे रुग्ण सापडले आहेत. नव्या रुग्णांमध्ये दोन जण शांडोंग प्रांत, एक शांघायमधील आणि एक गुआंगडोंग प्रांतातील आहे. देशात कुठल्याही रुग्णाचा दिवसभरात मृत्यू झालेला नाही. चीनमध्ये आतापर्यंत 82 हजार 995 कोरोनाबाधित सापडले असून 4,634 जणांना जीव गमवावा लागला आहे. कोरोना संसर्गावर चीनने आता बऱयाच अंशी नियंत्रण मिळविले आहे.
फ्रान्समध्ये दिवसात 52 मृत्यू

फ्रान्समध्ये मागील 24 तासांत 52 जणांचा मृत्यू झाला आहे. तेथील मृतांचा एकूण आकडा 28,714 झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने आतापर्यंत 1 लाख 1 हजार 390 बाधित रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती दिली आहे. यातील 17,904 जणांची प्रकृती गंभीर आहे. 67,803 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
द. आफ्रिका : 1,800 रुग्ण

दक्षिण आफ्रिकेत दिवसभरात सर्वाधिक 1,837 नवे बाधित सापडले आहेत. देशातील बाधितांचा एकूण आकडा आता 29 हजार 240 झाला आहे. तर एका दिवसात 34 जण दगावले आहेत. देशातील एकूण बळींचे प्रमाण 611 झाले आहे. दक्षिण आफ्रिकेत 15 हजार 93 जणांनी कोरोनाच्या संसर्गावर मात केली आहे. 24 तासांत 24 हजार 452 चाचण्या करण्यात आल्या आहेत.