त्यांची चाल पाहून वैज्ञानिक देखील दंग
प्राणी चार पायांवर कसे चालतात आणि माणूस स्वतःच्या हात आणि पायांच्या मदतीने का चालत नाही असे प्रश्न लहान मुलं अनेकदा विचारत असतात. तुम्ही कधी माणसाला स्वतःच्या हात-पायांच्या बळावर चालताना पाहिले आहे का? पण जगात एक असे कुटुंब आहे जे प्राण्यांप्रमाणेच स्वतःच्या हात-पायांचा वापर करून चालते.
तुर्कस्तानच्या एका छोटय़ाशा गावात हे अजब कुटुंब राहते. या कुटुंबातील लोक स्वतःच्या दोन पायांवर नव्हे तर हात-पायांचा वापर करून चालतात. त्यांना पाहून हजारो वर्षांच्या उत्क्रांतीचा त्यांच्यावर कुठलाच प्रभाव पडला नसल्याचे वाटते. प्रारंभिक काळात तुर्कस्तानच्या वैज्ञानिकांनी याला बॅकवर्ड इव्होल्युशन असे नाव दिले होते.
मानसिक आजाराचे कारण

रेसिट आणि हॅटिस उलास यांचे कुटुंब दीर्घकाळापर्यंत जगाच्या नजरेपासून दूर राहेल. 2005 मध्ये ब्रिटिश संशोधकाला तुर्कस्तानच्या एका प्राध्यपकाचा अप्रकाशित संशोधनपत्र पाहिल्यावर धक्काच बसला. प्राध्यापकाने उलास कुटुंबाबद्दल यात नमूद केले होते. कुटुंबाला यूनर टॅन सिंड्रोम असून यात लोक पायांसोबत हातांच वापर करून चालत असल्याचे प्राध्यापकांनी म्हटले होते. बॅकवर्ड इव्होल्युशनपासून सुरू झालेली थिअरी समोर आल्यावर वैज्ञानिकांचे कुतूहल वाढले. भावाबहिणींना कोजनेटिल ब्रेन इमपेयरमेंट आणि सेरिबेल एन्टाक्सिया हे मनोविकार असून यात दोन पायांवर संतुलन साधणे अत्यंत अवघड असते याचमुळे ते हातांची मदत घेऊन चालत असल्याचे संशोधनात दिसून आले.
मोठा प्रवास
रेसिट आणि हॅटिस उलास दोन पायांवरच चालायचे. परंतु त्यांच्या 19 मुलांपैकी 5 मुले दोन ऐवजी चार म्हणजेच हात आणि पायांचा वापर करून चालू लागली होती. आता 25-41 वर्षांपर्यंत पोहोचलेली ही भावंडं जगासमोर आली आहेत. परंतु पूर्वी त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. गावातील लोक त्यांना दगड मारण्यासह शिव्या द्यायचे. याचमुळे ते कधीच शाळेत गेले आहेत. पण त्यांनी कुर्दिश भाषा शिकली होती. यातील एक भाऊ हुसैन अशाप्रकारे कित्येक किलोमीटरचा प्रवास करतो.