सर्व ग्रामस्थ संस्कृतमधूनच करतात संभाषण
संस्कृत ही जगातील सर्वात प्राचीन भाषा आहे. अलिकडेच एका क्रिकेट सामन्याचे समालोचन संस्कृत भाषेतून करण्यात आले होते. या घटनेचा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच ट्विटरवर शेअर केला होता. आसाममधील एका गावाला आता ‘संस्कृत गाव’ म्हणूनच ओळखले जाते. या गावातील सर्व लोक 2015 पासून या प्राचीन आणि शास्त्राrय भाषेतून संभाषण करत आहेत.
या गावाचे नाव पटियाला असून ते करीमगंज जिल्हय़ातील राताबारी विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येते. या गावातील लहान मुलांपासून मोठय़ा व्यक्तीपर्यंत प्रत्येक जण संस्कृत भाषेतूनच परस्परांशी संवाद साधत असतो. गावात सुमारे 60 कुटुंबांचे वास्तव्य असून यात जवळपास 300 लोकांचा समावेश आहे. या गावाला ‘संस्कृत’ भाषेबद्दल मोठा गर्व आहे.

बदल घडवून आणण्याचा प्रयत्न
ग्रामस्थ आगामी पिढय़ांना ही भाषा बोलण्यासाठी प्रोत्साहित करत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. संस्कृत भाषेचा प्रचार करण्याचे लक्ष्य त्यांनी बाळगले आहे. या गावातील लोक नियमित स्वरुपात ‘योग शिबिरां’चे आयोजन करतात. या गावातील दीप नाथ हे योग शिक्षक आहेत. त्यांनी 2013 मध्ये योग शिबिराची सुरुवात केली होती. त्यानंतर 2015 मध्ये संस्कृत भारतीच्या कार्यकर्त्यांनी गावाचा दौरा केला होता.
2015 पासून संस्कृतमधून संभाषण
2015 पासून आम्ही संस्कृत भाषा शिकण्यास सुरुवात केली आणि आता गावातील प्रत्येक व्यक्ती ही भाषा बोलतो. आमच्या गावात 60 कुटुंबे असून यातील मुलांसोबत बोलताना या प्राचीन भाषेचा वापर केला जातो. आमच्या संस्कृतीला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. गावातील प्रत्येक निर्देश संस्कृतमध्ये दिले जात असल्याची माहिती दीप नाथ यांनी दिली आहे.
शेतकरीबहुल गाव
गावात दर महिन्याला गायत्री यज्ञाचेही आयोजन केले जाते आणि यात प्रत्येक ग्रामस्थ सहभागी होत असतो. गावातील बहुतांश लोक शेती करतात केवळ 15 जण नोकरी करत आहेत. या भागात अनीपुरबस्ती नावाचे आणखी एक गाव असून तेथील लोकांनीही संस्कृत भाषा अंगिकारली असल्याचे दीप नाथ यांनी सांगितले.