ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) हे अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर आहेत. शिवसैनिकांनी अयोध्येत आदित्य ठाकरेंच्या स्वागताची मोठी तयारी केली होती. त्यांचं स्वागतही मोठ्या उत्साहात करण्यात आलं. आदित्य ठाकरे यांनी आयोध्येत आज पत्रकार परिषद घेत ही आमची तीर्थयात्रा आहे राजकीय यात्रा नाही, इथे राजकारण करायला आलेलो नाही, रामलल्ला चे दर्शन घ्यायला आलो आहे. असं सांगितले. तसेच, अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठी जागा मिळावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही आदित्य ठाकरेंनी सांगितले.
आदित्य ठाकरे म्हणाले, “या तीन-चार वर्षाच्या काळात शिवसेना परिवारासोबत अयोध्येत चौथ्यांदा येत आहे. परंतु उत्साह, जल्लोष तसाच आहे आणि आता तर आपण बघत असाल, की मंदिर निर्माण होत असताना अजून उत्साहाने अनेक शिवसैनिक महाराष्ट्र, उत्तर प्रदेश किंवा अन्य राज्यांमधून हे अयोध्येत आलेले आहेत. रामजन्मभूमीत रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. मी सर्व माध्यमांना हीच विनंती करतो की, आमच्यासोबत जो उत्साह, जल्लोष आहे त्याचं देखील थोडं चित्रीकरण करावं आणि देशाला दाखवाव. कारण, हा एक वेगळा विषय आहे.”
ते पुढे म्हणाले, इथे रामलल्लांचं दर्शन घ्यायला आलो आहोत. देवळात गेल्यानंतर मी मागणी मागण्यापेक्षा आशीर्वाद घेत असतो. देवाकडे ऋण व्यक्त करत असतो. जी काही आतापर्यंत सेवा करण्याची संधी दिलेली आहे, तिच्यासाठी आम्ही धन्यवाद बोलत असतो. पुढे जे काही आमच्याकडून कार्य घडायचं असेल देशासाठी, समाजासाठी, लोकांसाठी किंवा राज्यासाठी असेल, जे काही कार्य असेल ते लोकांसाठी चांगलं होऊ दे, एवढंच आम्ही मागत असतो, असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलंय.
याचबरोबर, “महत्वाची गोष्ट म्हणजे आज इथे आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलेलं आहे, की ते स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलणार आहेत. पत्रव्यवहार करणार आहेत आणि या अयोध्येत या पावनभूमीत महाराष्ट्र सदनासाठी देखील जागा मागणार आहेत. साधारणपणे १०० खोल्यांचं किंवा जास्त जमले असं महाराष्ट्र सदन आम्हाला इथे बनवायचं आहे. महाराष्ट्रातून इथे अनेक भाविक येत असतात. त्यांना राहण्यासाठी एक चांगली जागा इथे निर्माण कराची आहे.” अशी माहिती यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारमधील पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे अयोध्येत आगमन होण्यापूर्वी त्यांचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्रातील सुमारे दोन हजार शिवसैनिक मंगळवारी रात्री उशिरा अयोध्येत पोहोचले होते. रात्री उशिरा विशेष ट्रेनने सुमारे 1200 शिवसैनिकांचा ताफा अयोध्या स्थानकावर दाखल झाला होता. तेथून त्यांना थेट नियुक्त धर्मशाळांमध्ये नेण्यात आले आणि आता त्यांनी आपल्या नेत्याचे जंगी स्वागत सुद्धा केले आहे. आदित्य ठाकरे बुधवारी दुपारी अयोध्येत पोहोचणार असून, ते प्रथम इस्कॉन मंदिरात दर्शन घेतील. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधतील. त्यानंतर थेट रामलल्लाच्या दर्शनासाठी जातील आणि संध्याकाळी शरयू नदीकाठी आरतीलाही उपस्थित राहतील.