टी-20 मालिकेत अफगाणचा सलग दुसरा विजय, फा रुकी सामनावीर
वृत्तसंस्था/ शारजा
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत अफगाणने रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात पाकचा 7 गड्यांनी पराभव केला. अफगाणचा या मालिकेतील हा सलग दुसरा विजय असून त्यांनी पाकवर आता 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. 19 धावात 2 बळी घेणाऱ्या फजलहक फारुकीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या मालिकेमध्ये पाकचे अव्वल क्रिकेटपटू सहभागी झाले नव्हते. कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिजवान आणि शाहीन आफ्रिदी यांची उणीव पाकला या मालिकेत चांगलीच भासली. या मालिकेसाठी शादाब खानकडे नेतृत्व सोपविण्यात आले होते.
या दुसऱ्या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 130 धावा जमविल्या. त्यानंतर अफगाणने 19.5 षटकात 3 बाद 133 धावा जमवित हा सामना 7 गड्यांनी आणि 1 चेंडू बाकी ठेवून जिंकला. या सलग दुसऱ्या विजयामुळे अफगाणने ही मालिका हस्तगत केली आहे. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना शारजाच्या स्टेडियमवर सोमवारी होत आहे.

पाकच्या डावामध्ये इमाद वासीमने 57 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 64 तर कर्णधार शादाब खानने 25 चेंडूत 3 चौकारांसह 32, तय्यब ताहिरने 23 चेंडूत 13 तर मोहम्मद हॅरिसने 9 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. पाकच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. फारुकीच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर सलामीचा अयुब खाते उघडण्यापूर्वी झेलबाद झाला. त्यानंतर फारुकीने पाकला आणखी एक धक्का देताना याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर अब्दुल्ला शफीकला पायचीत केले. पाकची स्थिती यावेळी 2 बाद 0 अशी होती. त्यानंतर नवीन उल हकने मोहम्मद हॅरिसला झेलबाद केले. करीम जनतने ताहिरला ओमरझाईकडे झेल देण्यास भाग पाडले. रशिद खानने आझम खानला एका धावेवर पायचीत केले. 11 षटकांअखेर पाकची स्थिती 5 बाद 63 अशी होती. कर्णधार शादाब खान आणि इमाद वासीम यांनी सहाव्या गड्यासाठी 67 धावांची भागीदारी केल्याने पाकला 130 धावांपर्यंत मजल मारता आली. डावातील शेवटच्या चेंडूवर शादाब खान धावचीत झाला. अफगाणतर्फे फारुखीने 19 धावात 2 तर नवीन उल हक, रशिद खान व करीम जनत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना गुरुबाज आणि उस्मान घनी या सलामीच्या जोडीने 4 षटकात 30 धावांची भागीदारी केली. पाकच्या झमान खानने उस्मान घनीचा 7 धावांवर त्रिफळा उडविला. गुरुबाज आणि इब्राहिम झद्रान या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 11.3 षटकात 56 धावांची भागीदारी केली. एकेरी धाव घेण्याच्या नादात गुरुबाज धावचीत झाला. त्याने 49 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 44 धावा जमविल्या. एहसानउल्लाहने इब्राहिम झद्रानला आझम खानकरवी झेलबाद केले. त्याने 40 चेंडूत 3 चौकारांसह 38 धावा जमविल्या. अफगाणला यावेळी विजयासाठी 29 धावांची जरुरी होती. नजबुल झद्रान आणि मोहम्मद नबी या जोडीने आपल्या संघाला 1 चेंडू बाकी असताना थरारक विजय मिळवून दिला. नजबुल झद्रानने 12 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 23 तर मोहम्मद नबीने 9 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 14 धावा केल्या. अफगाणच्या डावामध्ये 3 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे झमान खान आणि एहसान उल्ला यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
पाक 20 षटकात 6 बाद 130 (इमाद वासिम नाबाद 64, शादाब खान 32, ताहिर 13, मोहम्मद हॅरिस 15, आझम खान 1, फारुखी 2-19, नवीन उल हक 1-26, रशिद खान 1-16, करीम जनत 1-13), अफगाण 19.5 षटकात 3 बाद 133 (गुरुबाज 44, घनी 7, इब्राहिम झद्रान 38, नजबुल झद्रान नाबाद 23, मोहम्मद नबी नाबाद 14, अवांतर 7, झमान खान 1-22, एहसान उल्ला 1-23).