ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कोरोनानंतर आता सुपरबग विषाणूने जगाला चिंतेत टाकले आहे. सध्या अमेरिकेत हा विषाणू वेगाने पसरत असून, कोरोनानंतरचा हा दुसरा सर्वात मोठा धोका बनणार अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
अँटिबायोटिक औषधाच्या अतिवापरामुळे सुपरबग हा विषाणू पसरतो. कोरोनाकाळात बहुतांश रुग्णांना अँटिबायोटिक्स देण्यात आली होती. आताही प्रतिकारशक्ती कमकुवत झालेले लोक सर्दी-खोकल्यासाठी अँटिबायोटिक्सचा वापर करत आहेत. या सुपरबगमुळे अमेरिकेचं पाच अब्ज डॉलर्सचं नुकसान होत आहे. स्कॉलर ऍकॅडमिक जर्नल ऑफ फार्मसीच्या अहवालानुसार, गेल्या 15 वर्षांत जगभरात अँटिबायोटिक्सचा वापर 65 टक्क्मयांनी वाढला आहे. लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जर अँटिबायोटिक्सचा वापर असाच वाढत राहिला आणि सुपरबग सध्याच्या वेगाने पसरत राहिला तर दरवषी जगभरात एक कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो.
काय आहे सुपरबग?
सुपरबग हा जीवाणू, विषाणू आणि परजीवी यांचा एक प्रकार आहे. मायकोप्लासमा जेनिटेलियम असं या सुपरबग विषाणूचं नाव आहे. कोणत्याही अँटिबायोटिक औषधाच्या अतिवापरामुळे किंवा त्याचा विनाकारण वापर केल्यामुळे शरीरात सुपरबग्ज तयार होतात. डॉक्टरांच्या मते, फ्लूसारख्या विषाणूजन्य संसर्गाच्या बाबतीत अँटिबायोटिक्स घेतल्यास, सुपरबग होण्याची शक्यता जास्त असते. सुपरबग मानवासाठी घातक आहे. मानवी शरीरात या संसर्गाचे जीवाणू, विषाणू आणि परजीवी काळानुसार बदलतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रतिरोधक क्षमता निर्माण होते. त्यामुळे या संसर्गावर औषधेही कुचकामी ठरतात. परिणामी रुग्णावर उपचार करणे कठीण होते.
सुपरबग कसा पसरतो?
सुपरबगची लागण झालेल्या व्यक्तीच्या त्वचेशी, जखमेशी, लाळेशी संपर्क झाल्यास किंवा लैंगिक संबंधांद्वारे सुपरबग्स विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो. सुपरबग्सवर सध्या कोणतंही औषध उपलब्ध नाही. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानुसार, आपल्या देशात न्यूमोनिया आणि सेप्टिसिमियाच्या उपचारांसाठी वापरण्यात येणारी कार्बापेनेम ही औषधं आता सुपरबग समोर कुचकामी ठरत आहेत. पण, योग्य पद्धतींचा अवलंब करून तो टाळता येऊ शकतो.
काय काळजी घ्यावी?
डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अँटिबायोटिक औषधांचा वापर करावा, अँटिबायोटिक औषधं इतरांना शेअर करू नयेत. आजारी व्यक्तींच्या संपर्कात येणं टाळावं. आवश्यक त्यावेळी हँड सॅनिटायझरचा वापर करावा. स्वच्छ पाण्याचा उपयोग करावा.