दिल्ली येथे नीती आयोगाच्या बैठकीत : मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती,गोव्यातील विकासकामांसंदर्भात पंतप्रधानांना माहिती

प्रतिनिधी /पणजी
केंद्र सरकारच्या ‘भारत नेट’ योजनेतून ‘हर घर फायबर’ हा इंटनेट सुविधेचा प्रकल्प गोव्यात 100 टक्के घरांसाठी पूर्ण करणार असून गोव्यातील आदरातिथ्य उद्योगांसाठी येत्या पाच वर्षांत राज्यात 2 लाख मनुष्यबळाची पूर्तता केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नीती आयोगाच्या दिल्ली येथे बैठकीत दिली. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीत पुढे सांगितले की, सक्षम विकासात गोवा राज्याने चांगली प्रगती केली असून मानांकनात 7 या क्रमांकावरून सुधारणा होऊन गोवा 3 क्रमांकावर आलेला आहे. तो क्रमांक आणखी सुधारून गोवा राज्य त्या क्षेत्रात दुसऱया किंवा प्रथम क्रमांकावर आणण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाची कार्यवाही सुरू
खर्चात कपात करून वायफळ खर्च वाचवला म्हणून वित्तीय क्षेत्रात काही बदल घडवण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाची कार्यवाही गोव्यात सुरू करण्यात आली असून ती टप्प्याटप्प्याने पुढे नेण्यात येणार आहे. शहरी भागातील कचरा विल्हेवाट प्रकल्पावर भर देण्यात आला असून त्याचे व्यवस्थापनही करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कृषी क्षेत्रात बदल घडवण्याचा प्रयत्न
ते पुढे म्हणाले की, राज्यात हरित, सफेद व निळी क्रांती करण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यात येत असून कृषी क्षेत्रात फुले, फळे, पिके यात बदल घडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. किसान कार्ड, किसान क्रेडिट कार्ड व माती कार्ड यांची 100 टक्के कार्यवाही करण्यावर भर देण्यात येत आहे. कृषी, डेअरी व इतर सर्व प्रकारच्या शेतकऱयाना त्याच्या कार्डाचा लाभ मिळवून देण्यासही सरकार काम करीत आहे.
सर्व घरांना नेट सुविधा देणार
गुजरातप्रमाणे गोव्यातही विद्या समीक्षा केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. हर घर नळ व वीज नेण्याचे काम नेटाने चालू असून त्याच पद्धतीने केंद्र सरकारमार्फत भारत नेट प्रकल्प राबवून सर्व घरांना नेट सेवा देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांच्या भेटीत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गोव्यासह इतर विविध विषयांवर चर्चा केली आणि त्यांना गोव्यातील विविध विकासकामांची माहिती दिली.