कांगारूंचा 2-1 फरकाने मालिकाविजय, झाम्पा सामनावीर, मार्श मालिकावीर, भारतीय फलंदाजांची हाराकिरी
वृत्तसंस्था/ चेन्नई
ऍडम झाम्पाच्या जादुमय फिरकीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने येथे झालेल्या तिसऱया व निर्णायक वनडे सामन्यात भारतावर 21 धावांनी विजय मिळवित तीन सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.
हार्दिक पंडय़ाची भेदक गोलंदाजी व कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियन फलंदाजांची परीक्षा घेणारी गोलंदाजी केल्यानंतरही ऑस्ट्रेलियाने तिसऱया व शेवटच्या वनडे सामन्यात 49 षटकांत सर्व बाद 269 धावांपर्यंत मजल मारली. हार्दिक व कुलदीप यांनी प्रत्येकी 3 बळी टिपले. त्यानंतर ऍडम झाम्पा व ऍश्टन ऍगर यांनी भेदक फिरकीवर भारताचा डाव 49.1 षटकांत 248 धावांत गुंडाळत सामन्यासह मालिकविजय साकार केला.

भारताने आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली होती. पण मोठे फटके मारण्याच्या नादात भारतीय फलंदाजांनी विकेट्स फेकल्या. कोहली व राहुल यांनी 69 धावांची भागीदारी करून आव्हान राखले होते. पण दोघेही उत्तुंग फटके मारताना बाद झाले. ही जोडी फुटल्यानंतर भारताने 43 धावांत 4 गडी गमावले. कोहलीने शेवटपर्यंत टिकून राहण्याची गरज होती. पण अनावश्यक मोठा फटका मारण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. त्याने 72 चेंडूत 54 धावा केल्या. राहुल 32, हार्दिक पंडय़ा 40 धावा काढून बाद झाले. संथ झालेल्या खेळपट्टीचा लाभ घेत झाम्पाने 45 धावांत 4, ऍगरने 41 धावांत 2 बळी मिळविले. याशिवाय ऍबट व स्टोईनिस यांनी एकेक बळी मिळविले.
हार्दिक, कुलदीप प्रभावी

हार्दिकने आघाडीच्या तीन फलंदाजांचे बळी मिळविले तर कुलदीपने जादुमय फिरकीवर नंतरच्या तीन फलंदाजांना बाद केले. त्याने ऍलेक्स कॅरेला टाकलेला चेंडू तर या मालिकेतील सर्वोत्तम चेंडू असल्याचे म्हटले जात आहे. फिरकीस सहाय्य मिळणाऱया खेळपट्टीवर आपल्या लेगब्रेकवर त्याने डावखुऱया कॅरेला चकमा दिला आणि त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त झाल्यानंतर कुलदीपने जोरदार जल्लोष केला. ऑस्ट्रेलियाला 5 बाद 138 धावांवर रोखत भारताने डावावर नियंत्रण मिळविले होते. पण कॅरे व स्टोईनिस यांनी सहाव्या गडय़ासाठी केलेली 58 आणि आठव्या गडय़ासाठी सीन ऍबट (26) व ऍश्टन ऍगर (17) यांनी केलेल्या 42 धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाला अडीचशेची मजल मारता आली. याशिवाय मिचेल स्टार्क व ऍडम झाम्पा यांनीही शेवटच्या गडय़ासाठी 22 धावा जोडल्या.
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱया ऑस्ट्रेलियाला मिचेल मार्श (47) व ट्रव्हिस हेड (31 चेंडूत 33) यांनी 68 धावांची अर्धशतकी सलामी दिली होती. पण हार्दिक पंडय़ाने तीन बळी मिळवित भारताला पकड मिळवून दिली. डेव्हिड वॉर्नर (31 चेंडूत 23), मार्नस लाबुशेन (45 चेंडूत 28) यांनी कुलदीपच्या गोलंदाजीवर चुकीचे फटके मारले. कॅरेने (46 चेंडूत 38) या दौऱयात प्रथमच मोठी खेळी करण्याच्या दिशेने आगेकूच सुरू केली होती. पण कुलदीपच्या एका अप्रतिम चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला.
मार्शने पहिल्या दोन सामन्यांत अर्धशतकी खेळी केल्या होत्या. या डावातही तो त्याच दिशेने वाटचाल करीत होता. पहिल्या पॉवरप्लेमध्ये त्याने चौकारांचा सपाटा सुरू केला आणि एक षटकारही मारला. त्याचा साथीदार हेडनेही फटकेबाजी करीत धावा जोडल्या होत्या. हेडला स्क्वेअरलेग सीमारेषेजवळ गिलने सोपे जीवदान दिले होते. हार्दिक पंडय़ाने पहिले यश मिळवून देताना हेडला बाद केले. हेडने स्लॅश केलेला चेंडू थर्डमॅनवर कुलदीपने अचूक टिपला. हार्दिकने नंतर शेवटचा भारत दौरा करणाऱया स्टीव्ह स्मिथला (0) यष्टिरक्षकाकरवी झेलबाद केले. बॅक ऑफ लेंग्थ व फुलर चेंडूवर बळी मिळविल्यानंतर हार्दिकने मार्शला गुडलेंग्थ चेंडूवर बाद केले. मार्श 47 धावांवर बाद झाल्याने त्याचे मालिकेतील तिसरे अर्धशतक हुकले.
चौथ्या क्रमांकावर खेळणाऱया वॉर्नरने लाबुशेनसमवेत 40 धावांची भर घातली. कुलदीपला चेंडूपर्यंत पोहोचण्याआधीच मारलेला वॉर्नरचा फटका हुकला आणि लाँगऑफ क्षेत्रात त्याचा झेल हार्दिकने आरामात टिपला. लाबुशेनने यातून बोध न घेता उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. मात्र तळाच्या फलंदाजांनी बऱयापैकी प्रतिकार करीत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. स्टार्कला बाद करून सिराजने ऑस्ट्रेलियाचा डाव 49 षटकांत 269 धावांवर संपुष्टात आणला. विशेष म्हणजे कर्णधार स्मिथ वगळता ऑस्ट्रेलियाच्या सर्व फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. अक्षर पटेल व सिराज यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया 49 षटकांत सर्व बाद 269 ः हेड 33 (31 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), मिचेल मार्श 47 (47 चेंडूत 8 चौकार, 1 षटकार), स्मिथ 0 (3 चेंडू), वॉर्नर 23 (31 चेंडूत 1 चौकार), लाबुशेन 28 (45 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), कॅरे 38 (46 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), स्टोईनिस 25 (26 चेंडूत 3 चौकार), ऍबट 26 (23 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), ऍगर 17 (21 चेंडूत 1 षटकार), स्टार्क 10 (11 चेंडूत 1 षटकार), झाम्पा नाबाद 10 (11 चेंडूत 1 चौकार), अवांतर 12. गोलंदाजी ः हार्दिक पंडय़ा 3-44, कुलदीप यादव 3-56, सिराज 2-37, अक्षर पटेल 2-57, जडेजा 0-34.
भारत 49.1 षटकांत सर्व बाद 248 ः रोहित 30 (17 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), गिल 37 (49 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), कोहली 54 (72 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), केएल राहुल 32 (50 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), अक्षर पटेल 2, हार्दिक पंडय़ा 40 (40 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), सूर्यकुमार यादव 0, जडेजा 18 (33 चेंडूत 1 चौकार), कुलदीप 6, शमी 14 (10 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), सिराज नाबाद 3, अवांतर 12. गोलंदाजी ः झाम्पा 4-45, ऍगर 2-41, ऍबट 1-50, स्टोईनिस 1-43.