पहिली कसोटी केवळ दोन दिवसात समाप्त, 34 बळींची नोंद, स्टार्कच्या बळींचे त्रिशतक
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
यजमान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा केवळ दोन दिवसामध्ये सहा गडय़ांनी पराभव केला. ब्रिस्बेनची गवत असलेली हिरवीगार खेळपट्टी गोलंदाजीला अनकुल ठरली. या दोन दिवसांच्या कालावधीत एकूण 34 गडी बाद झाले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा पहिला डावात 48.2 षटकात 152 धावात आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 218 धावा जमवत दक्षिण आफ्रिकेवर 66 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 37.4 षटकात 99 धावात आटोपला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 34 धावांची जरुरी होती आणि त्यांनी आपल्या दुसऱया 7.5 षटकात 4 बाद 35 धावा जमवत हा सामना सहा गडय़ांनी जिंकला.

या सामन्यातील रविवारी खेळाच्या दुसऱया दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव उपाहारापूर्वीच 218 धावावर आटोपला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी केवळ 37.4 षटकात 99 धावात गुंडाळले. कर्णधार कमिन्सने 42 धावात 5 तर स्टार्क आणि बोलँड यांनी प्रत्येकी 2 तसेच लियॉनने एक गडी बाद केला. दक्षिण आफ्रिकेच्या डावामध्ये नवोदित झोंडोने 6 चौकारासह नाबाद 36 तर बेहुमाने 3 चौकारासह 29, आणि केशव महाराजने 3 चौकारासह 16 धावा जमवल्या. त्यांच्या उर्वरित फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या स्टार्कने कसोटी क्रिकेटमधील आपले बळींचे त्रिशतक पूर्ण केले. तत्पुर्वी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात दक्षिण आप्रेकेच्या रबाडाने 76 धावात 4 तर जेनसनने 32 धावात 3, नॉर्त्जेने 52 धावात 2 आणि एन्गिडीने 1 गडी बाद केला होता. ऑस्ट्रेलियाच्या हेडने 1 षटकार आणि 13 चौकारासह 92 तर स्मिथने 3 चौकारासह 36 तसेच कॅरेने नाबाद 22 धावा जमवल्या.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी केवळ 34 धावांची जरुरी होती पण रबाडाच्या अप्रतिम गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज बाद झाले. ऑस्ट्रेलियाने 7.5 षटकात 4 बाद 35 धावा जमवत हा सामना जिंकला. रबाडाने उस्मान ख्वाजा, वॉर्नर, स्मिथ आणि हेड यांना दुहेरी धावसंख्या गाठण्यापूर्वीच बाद केले. त्याने 13 धावात 4 गडी बाद केले. या कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवशी 15 गडी तर खेळाच्या दुसरी दिवशी 19 गडी असे एकूण दोन दिवसांच्या कालावधीत 34 बळी नोंदवले गेले. ही कसोटी केवळ गोलंदाजांनी गाजवली. आता उभय संघातील दुसरी कसोटी मेलबोर्न येथे 26 डिसेंबरपासून खेळवली जाईल.
संक्षिप्त धावफलक ः दक्षिण आफ्रिका प. डाव 152, ऑस्ट्रेलिया प. डाव 50.3 षटकात 218 (हेड 92, स्मिथ 36, कॅरे नाबाद 22, ग्रीन 18, रबाडा 4-76, जेनसन 3-32, नॉर्त्जे 2-52, एन्गिडी 1-35), दक्षिण आफ्रिका दु. डाव 37.4 षटकात सर्वबाद 99, (झोंडो नाबाद 36, बेहुमा 29, केशव महाराज 16, कमिन्स 5-42, स्टार्क 2-26, बोलँड 2-14, लियॉन 1-17), ऑस्ट्रेलिया दु. डाव 7.5 षटकात 4 बाद 35 (लाबुशेन नाबाद 5, ख्वाजा 2, वॉर्नर 3, स्मिथ 6, हेड 0, रबाडा 4-13).