संतोष पोळ हत्याकांडाची सुनावणी, अटी व शर्थीवर एक वर्षासाठी जामिन मंजूर
प्रतिनिधी/ सातारा
वाई तालुक्यात खळबळ माजवणाऱया सिरियल किलिंगमधील मुख्य संशयित संतोष पोळ याची माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला काही अटी व शर्थीवर प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधिश ए. एस. जाधव यांनी 1 वर्षाकरता जामीन मंजूर केला आहे. ज्योती मांढरे हिची बाजू न्यायालयासमोर ऍड. विक्रम काकडे यांनी मांडली. तिच्या मेडिकलच्या व्याधीच्या अनुषंगाने त्यांनी प्रखरपणे म्हणणे मांडल्याने न्यायालयाने ज्योती मांढरे हिला दि. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, सरकार पक्षाच्यावतीने ऍड. मिलिंद ओक यांनी काम पाहिले तर संतोष पोळ याने त्याच्यावतीने कोणताही वकील दिला गेला नाही.
वाई तालुक्यासह अवघ्या राज्याचे लक्ष वेधून घेतलेली घटना म्हणजे धोम गावासह परिसरातील महिलांचे खून करणाऱया अवलिया संतोष पोळ याची. त्याचा सगळा बनाव, समाजसेवेचा बुरखा वाई पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांनी उघडकीस आणला. ऑगस्ट 2016 मध्ये धोम गावातील त्यांच्या शेती फॉर्मवर त्यांच्या ओपीडीत खून केलेल्या महिलांचे मृतदेह पुरले होते. त्यावर झाडे लावली होती. पुरलेले मृतदेहाचे अवशेष पोलिसांनी त्यावेळी बाहेर काढून फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते. त्याचवेळी संतोष पोळ याच्यासोबत त्याची साथीदार ज्योती मांढरे हिलाही पकडण्यात आले होते. त्यावेळी अंगणवाडी सेविका संघटनेच्या नेत्या मंगल जेधे या अचानक गायब झाल्याने जेव्हा अंगणवाडी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला. तेव्हा प्रशासन खडबडून जागे झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. तत्कालिन पोलीस अधिकाऱयांनी ज्योती मांढरे हिच्या फोनच्या लोकेशनवरुन तिला ट्रप करुन पकडले होते. तिचाही संतोष पोळ याने खून करण्याचे नियोजन केले होते. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा बनाव रचून तो आळ तात्कालिन पोलीस निरीक्षक वेताळ यांच्यावर आणण्याचा कटही त्यावेळी रचल्याचे उघडकीस पोलिसांनी आणले होते. तेव्हापासून संतोष पोळ आणि ज्योती मांढरे हे तुरुंगात आहेत. ज्योती मांढरे ही माफीची साक्षीदार झाल्याने तिला त्रास देण्याच्या उद्देशाने संतोष पोळ वारंवार न्यायालयाकडे अर्ज करत होता. सातारा जिल्हा न्यायालयात या प्रकरणाच्या अनुषगाने न्यायालयाच्या समोर सुनावण्या होत आहेत.
दरम्यान, संतोष पोळ याचे वकील ऍड. हुडगीकर यांनी सेवानिवृत्ती घेतली आहे. त्यामुळे त्याला वकील नसून न्यायालयाने त्याला गेल्या सात महिन्यापासून वकील देण्याची विनंती केली आहे. तरीही त्याच्याकडून वकील दिला जात नाही. असे असतानाच ज्योती मांढरे हिच्यावतीने ऍड. विक्रम काकडे हे काम पाहत असून त्यांनी ज्योती मांढरे हिला दुर्धर असा आजार आहे. त्या आजारावरील उपचाराकरता जिल्हा रुग्णालयात तिच्यावर सातत्याने उपचार करण्यात येत आहे. परंतु तेथे उपचार करण्यासाठी न्यूरोसर्जन आणि मधुमेहावरील स्पेशल वैद्यकीय तज्ञ नाहीत. त्यामुळे तिच्यावर जिल्हा रुग्णालयात दि. 13 सप्टेंबर ते दि. 16 सप्टेंबर या काळात ऍडमिट करुन उपचार केले. परंतु प्रभावीपणे उपचार होऊ शकले नाहीत. तिच्यावर खाजगी रुग्णालयात व अन्य रुग्णालयात उपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा तिच्या जीवावर बेतू शकते. तिच्या उपचाराच्या अनुषंगाने तिला तात्पुरता जामीन मिळावा, अशी विनंती न्यायाधिशाच्यासमोर ऍड. विक्रम काकडे यांनी केली. न्यायाधिश जाधव यांनी त्यांनी मांडलेल्या म्हणण्याचा विचार करुन ज्योती मांढरे हिला 15 हजार रुपयांच्या जात मुचूलक्यावर जिह्यातून बाहेर न्यायालयाच्या परवानगीशिवाय जाता येणार नाही. वैद्यकीय उपचार करण्यासाठी ती जावू शकते. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत तिला जामीन देण्यात आला आहे.
संतोष पोळ हा वकीलच देईना
खून खटल्यातील मुख्य संशयित असलेला संतोष पोळ याचे वकील ऍड. हुडगीकर यांनी सेवानिवृत्ती घेतली आहे. तर ज्योती मांढरे हिच्यावर तीन केसेस आहेत. केस नंबर 163/2016चा सरकार पक्षाच्यावतीने सरतपास व संशयित आरोपीच्या वकीलांचा उलटतपास सुरु आहे. तसेच सेशन केस नंबर 161 अ आणि 162 मध्ये ज्योती मांढरे हिचा सरतपास सरकार पक्षाच्यावतीने पुर्ण केला. त्यामध्ये आरोपी संतोष पोळ याचा उलट तपास सुरु होता. संतोष पोळ याची बाजू माडण्यासाठी तो वकील देत नाही. त्याला न्यायालयाने विनंती केली आहे, असे न्यायालयातून सांगण्यात आले.