पाच रुपयात उपलब्ध होणार कापडी पिशवी : प्रायोगिकतत्त्वावर एक मशीन बसविण्याचा प्रस्ताव
बेळगाव : देशभरात प्लास्टिक बंदीचा आदेश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावला आहे. मात्र याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात नाही. बेळगाव महापालिका व्याप्तीत प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. प्लास्टिकपासून नागरिकांना दूर करण्यासाठी महापालिकेकडून प्रायोगिकतत्त्वावर कापडी पिशव्या विक्री मशीन उपलब्ध करून नवा उपक्रम राबविला जाणार आहे.
प्लास्टिक बंदी आणि शहराच्या स्वच्छतेसाठी महापालिकेकडून विविध उपक्रम राबविले जातात. विविध संघटनांच्या माध्यमांतून हे उपक्रम राबवून नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली जाते. मात्र झोपेचे सेंग घेतलेल्या नागरिकांमध्ये याबाबत कोणतीच जागृती आल्याचे दिसत नाही. त्यामुळेच प्लास्टिक बंदी असूनही प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. दररोज शेकडो टन प्लास्टिकची विक्री शहरात होत आहे. केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक बंदीचा आदेश बजावूनही प्लास्टिकचा वापर सुरू आहे. प्लास्टिकचा वापर टाळावा, याकरिता महापालिकेकडून जागृती मोहिमेसह दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला होता. तरीदखील प्लास्टिकचा वापर केला जातो.
रोटरी क्लबच्या साहाय्याने उपक्रम राबविण्यात येणार
मागीलवर्षी प्लास्टिक बंदीच्या जागृतीसाठी महापालिकेच्यावतीने कापडी पिशव्यांचे मोफत वितरण करण्यात आले होते. याचपद्धतीने महापालिकेने नवा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र याकरिता नागरिकांना 5 रुपये मोजावे लागणार आहेत. बऱ्याचदा साहित्य खरेदी करताना प्लास्टिकच्या पिशवीची मागणी केली जाते. ही पिशवी सहज उपलब्ध करण्यासाठी महापालिकेकडून कापडी पिशव्या विक्रीची मशीन (क्लॉथ बॅग वेंडिंग मशीन) बसविली जाणार आहे. रोटरी क्लबच्या साहाय्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. चेन्नई येथे हा उपक्रम यशस्वीरित्या राबविला आहे. तसेच इंदोर शहरात 49 ठिकाणी अशा मशीन बसवून कापडी पिशव्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर बेळगाव शहरात हा उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव आहे.
येत्या दोन दिवसांत मशीन दाखल होणार…
प्रायोगिकतत्त्वावर सध्या एक मशीन उपलब्ध करण्यात येणार आहे. 5 रुपयाचे नाणे घातल्यानंतर कापडी पिशवी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांसाठी सोयीचे होणार असून प्लास्टिक वापर टाळण्यासाठी जागृतीही केली जाणार आहे. येत्या दोन दिवसांत ही मशीन शहरात दाखल होणार असून कोणत्या ठिकाणी बसविणार? याबाबत महापालिकेने स्थळ निश्चित केले नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.