विधानसभेत आज चर्चा होण्याची शक्यता : कर्नाटकात भ्रष्टाचार बोकाळला
प्रतिनिधी/बेळगाव
40 टक्के कमिशनच्या मुद्द्यावर सोमवारी काँग्रेसने स्थगन प्रस्ताव मांडला आहे. सोमवारच्या कामकाजाला सुरुवात होताच सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली. शून्य तासानंतर स्थगन प्रस्ताव स्वीकारायचा की नाही? यावर काँग्रेस व सत्ताधारी भाजप नेत्यांमध्ये वादंग झाला.
वीरबाल दिवसाच्या पार्श्वभूमीवर गुरुगोविंद सिंगांच्या दोन मुलांच्या त्याग व बलिदानाचा उल्लेख करून एक मिनिट मौन पाळून त्यांना विधानसभेत आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभाध्यक्षांनी सर्व आमदारांना मास्क परिधान करण्याची सूचना केली. हवे तर मास्क मागवून घ्या, मात्र प्रत्येक जणाने ते परिधान करा, असे सूचित केले.
शून्य तासानंतर सभाध्यक्षांनी काँग्रेसच्या स्थगन प्रस्तावाचा उल्लेख केला. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी कोणावरही ठोस आरोप करीत स्थगन प्रस्ताव दिला नाही. वेगवेगळ्या सरकारी खात्यात भ्रष्टाचार फोफावला आहे. त्यावर चर्चा करायची आहे, असा उल्लेख आहे. त्यामुळे नियमानुसार हा स्थगन प्रस्ताव ठरणार नाही. हवे तर नियम 69 अन्वये चर्चेला संधी देऊ, असे सभाध्यक्षांनी सांगितले.
कर्नाटकात भ्रष्टाचार बोकाळला आहे. याच सभागृहात 40 टक्केचा मुद्दा आपण दोन वेळा मांडला. मात्र, तो चर्चेला आला नाही. भ्रष्टाचाराशिवाय एकही सरकारी विभाग नाही. त्यामुळे आपण स्थगन प्रस्ताव दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. कायदा व संसदीय व्यवहारमंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी ठोस आरोप नसल्यामुळे स्थगन प्रस्ताव मांडता येत नाही. हवे तर सभाध्यक्षांनी त्यांना इतर नियमानुसार चर्चेला संधी द्यावी, आम्ही तयार आहोत. कोणाच्या काळात किती भ्रष्टाचार झाला आहे, हे आम्हालाही मांडू द्या, असे सांगत सिद्धरामय्या यांना टोला हाणला.
सिद्धरामय्या यांनी याला विरोध केला. मात्र, नियमानुसार नियम 69 अन्वये चर्चेची संधी देण्यात येईल, असे सभाध्यक्षांनी जाहीर केले. मंगळवारी हा मुद्दा विधानसभेत चर्चेला येण्याची शक्यता आहे.