प्रतिनिधी/ पणजी
उद्या सोमवारपासून सुरु होणाऱया राज्य विधानसभेच्या वर्षाकालीन अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसने संयुक्तपणे काही विषय सभागृहात उपस्थित करण्याचे ठरविले. काँग्रेस विधिमंडळ गटाची बैठक पणजीत झाली. या बैठकीत विविध विषयांसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व बैठकीस उपस्थित राहिलेले गोवा डेस्क प्रमुख दिनेश गुंडूराव यांनी सांगितले की, विधानसभा अधिवेशनसंदर्भात बैठकीत एकंदरित सभागृहात सर्वांनी एकत्रितपणे कामकाज कसे पुढे न्यावे यावर चर्चा झाली. तसेच काँग्रेसचा आवाज दडपून टाकण्यासाठी भाजपकडून विविध प्रकारे दबाव यंत्र चालू आहे. तथापि, काँग्रेसचे आमदार व पक्ष गप्प बसणार नाहीत. जनतेचा आवाज आम्ही सभागृहात उठविल्याशिवाय राहाणार नाही, असे गुंडूराव म्हणाले.
या बैठकीस माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे गैरहजर राहिले. या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता दिगंबर कामत हे एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पर्तगाळ काणकोण येथे गेले आहेत. त्याचबरोबर काँग्रेस पक्षात फूट घालण्याचा प्रयत्न भाजपवाले करीत आहेत. तथापि, काँग्रेस पक्ष एकजूट आणि एकसंघ आहे, असा दावा त्यांनी केला.
आपण कोलकाताला गेलो होतो ः दिगंबर
माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या कपोकल्पीत दिल्लीवारीसंदर्भात चौकशी केली असता त्यांनी आपण दिल्लीला गेल्याच्या वृत्ताचे खंडण केले. आपण कोलकाता येथे एका कार्यक्रमास सहभागी होण्यासाठी दोन दिवसांपूर्वी गेलो होतो आणि शनिवारी दुपारी गोव्यात पोहोचलो. त्यानंतर आपण लगेच बाहेरच्या बाहेर पर्तगाळी येथे गेलो. स्वामीजींच्या पुण्यतिथीनिमित्तच्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो. काँगेसचे निरीक्षक गुंडूराव यांना आपण बैठकीस उपस्थित राहू शकणार नाही असे कळविले होते, असे दिगंबर कामत म्हणाले.