
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
स्पोर्टींग प्लॅनेट फुटबॉल क्लब आयोजित इंडिपेंडंट चषक ऑल इंडिया निमंत्रितांच्या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुफीयान बेपारीच्या एकमेव गोलाच्या जोरावर बुफा इलेव्हन संघाने दर्शन युनायटेड संघाचा 1-0 असा पराभव करून इंडिपेंडंट चषक पटकावित 50 हजार रूपयांचे बक्षीस पटकावले. नजीब इनामदार उत्कृष्ट खेळाडू, धनीश सावंत उत्कृष्ट गोलरक्षक यांना गौरविण्यात आले.
महांतेशनगर येथील लव्ह डेल स्कूलच्या स्पोर्टींग प्लॅनेट टर्फ मैदानावर ऑल इंडिया स्पर्धेत गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकातून 16 संघांना निमंत्रित करण्यात आले होते. गोवा, कोल्हापूर, गडहिंग्लज, मिरज, बेळगाव येथील संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. पहिल्या उपांत्य सामन्यात दर्शन युनायटेड संघाने ब्रदर्स युनायटेड संघाचा टायब्रेकरमध्ये 3-1 असा पराभव केला. दर्शनतर्फे कौशिक पाटील, राहुल गुरल व अखिलेश अष्टेकर यांनी गोल केले तर ब्रदर्सतर्फे ताह शेखने गोल केला. दुसऱया उपांत्य सामन्यात बुफाने तिरंगा संघाचा 1-0 असा पराभव केला. सुफियान बाँम्बेवालेने एकमेव गोल केला.
सायंकाळी अंतिम सामन्याला अमान शेठ, पवन शेट्टी व इतर मान्यवरांच्या हस्ते बुफा व दर्शन युनायटेड संघाच्या खेळाडुंची ओळख करून दिल्यानंतर सुरूवात करण्यात आली. 11 व्या मिनिटाला बुफाच्या नजीब इनामदारने मारलेला फटका दर्शनचा गोलरक्षक धनीश सावंतने अडविला. 18 व्या मिनिटाला दर्शन युनायटेडच्या कौशीक पाटीलने मारलेला फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. पहिल्या सत्रात दोन्ही संघाना गोल करण्यात अपयश आले. दुसऱया सत्रात 34 व्या मिनिटाला राहुल गुरवने गोल करण्याची नामी संघी वाया घालवली. 45 व्या मिनिटाला बुफाच्या अभिषेक चेरेकरच्या उत्कृष्ट पासवर सुफियान बाँम्बेवालेने सुरेख गोल करून 1-0 ची आघाडी बुफाला मिळवून दिली. त्यानंतर दर्शनने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. शेवटी हा सामना बुफाने 1-0 अशा फरकाने विजय मिळवित विजेतेपद पटकाविले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे अमान शेठ, पवन शेट्टी, राजा मुल्ला, अष्पाक घोरी, अकिब बेपारी, नाशिर पठाण यांच्या हस्ते विजेत्या बुफा संघाला 50 हजार रूपये रोख व आकर्षक चषक तर उपविजेत्या दर्शन युनायटेड संघाला 25 हजार रूपये रोख व आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून नजीब इनामदार (बुफा) व उत्कृष्ट गोलरक्षक धनीश सावंत यांना चषक व रोख 1 हजार रूपये देवून गौरविण्यात आले. यावेळी वासीम गवस, उबेदुल्ला, आबादुल्ला व इजाज, प्रणय शेट्टी आदी उपस्थित होते. अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून अम्रान बेपारी, पवन देसाई, अमिन बेपारी यांनी काम पाहिले.