ड्रेनेजचे पाणी घरांमध्ये साचण्याचे प्रकार : जुन्या डेनेजवाहिन्या बदलण्याची मागणी

बेळगाव : वडगाव, भाग्यनगर, टिळकवाडी अशा परिसरात बहुमजली इमारतींची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पण येथील डेनेजवाहिन्या जुन्याच आहेत. परिणामी सांडपाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होऊन ड्रेनेजचे पाणी घरांमध्ये साचू लागले आहे. या समस्येचे निवारण करण्याकडे मनपाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. शहरातील 48 किलोमीटरच्या डेनेजवाहिन्या घालण्याचे काम करण्यात आले आहे. मात्र वडगाव परिसरातील डेनेजवाहिन्या बदलण्यात आल्या नाहीत. विशेषत: राम कॉलनी, आदर्शनगर परिसरात जुन्याच वाहिन्या असून त्या बदलण्याची आवश्यकता आहे. टिळकवाडी, भाग्यनगर, अनगोळ अशा विविध भागातील सांडपाण्याचा निचरा डेनेजवाहिन्यांद्वारे होत असतो. अलीकडे बहुमजली रहिवासी संकुलांची संख्या वाढली आहे. लोकसंख्येचा आकडा वाढत असून लोकसंख्येच्या मानाने डेनेजवाहिन्या अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे बॅक वॉटर येण्याची समस्या भेडसावू लागली आहे. वडगाव परिसरातील राम कॉलनी वसाहतीमध्येही समस्या गेल्या चार दिवसांपासून निर्माण झाली आहे.
येथील डेनेज चेंबर तुंबल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. डेनेज चेंबर फ्लो होऊन वाहू लागले आहेत. सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत सांडपाण्याचे प्रमाण वाढते. यादरम्यान काही रहिवाशांच्या घरात बॅक वॉटर येत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी डेनेजवाहिन्या तुंबल्याने ही समस्या उद्भवत आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेण्यात आली नाही. तर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या समस्येची पाहणी केली. सदर समस्येची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला द्यावी, असे सांगून निघून गेले. मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत तक्रारी केली असता आरोग्य विभागाकडे तक्रार करावी, असे सांगून हात झटकण्यात आले. येथील डेनेजवाहिन्यांच्या समस्येबाबत मनपातील अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट करून जबाबदारी झटकण्याचा प्रकार चालविला आहे. पण याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. शौचालयात तसेच बाथरूममध्ये सांडपाणी साचून राहत आहे. रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून ही समस्या निर्माण झाल्याने राम कॉलनीमध्ये काही रहिवाशांनी शुक्रवारी सकाळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पुन्हा एकदा तक्रार केली असता पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीत आहोत, असे सांगून मोबाईल बंद केला. त्यामुळे जनतेच्या समस्या कोण सोडविणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे. येथील सांडपाण्याच्या समस्येचे निवारण करण्यासह जुन्या डेनेजवाहिन्या बदलण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.