प्रादेशिक आयुक्तांनी विधान परिषदच्या उमेदवारांसह प्रतिनिधींची घेतली बैठक
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक वायव्य पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सोमवारी होत आहे. या निवडणुकीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी आणि प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची शुक्रवारी बैठक झाली. यामध्ये त्यांनी ही माहिती दिली.
सोमवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदानासाठी वेळ दिला आहे. मतदान केंद्रात जाताना मास्कचा वापर करावा लागणार आहे. मतदान केल्यानंतर पदवीधर मतदारांना उजव्या हाताच्या तर्जनी बोटाला शाई लावली जाणार आहे तर वायव्य शिक्षक मतदारांच्या मधल्या बोटाला शाई लावली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आतापर्यंत कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नाही. यापुढेही उल्लंघन होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे सांगितले. मतदारांना घरोघरी चिठ्ठय़ा पाठविल्या आहेत. आतापर्यंत 55 टक्के मतदारांना चिठ्ठय़ा पोहोचल्या आहेत तर दोन दिवसांत सर्वांनाच चिठ्ठय़ा पोहोचविल्या जातील, असेही सांगितले.
वायव्य शिक्षक मतदारसंघासाठी एकूण 25 हजार 388 मतदार आहेत. त्यामध्ये 17 हजार 238 पुरुष तर 8 हजार 150 महिला मतदार आहेत. वायव्य पदवीधर मतदारसंघासाठी 99 हजार 538 मतदार आहेत. त्यामध्ये 71 हजार 40 पुरुष तर 28 हजार 554 महिला मतदारांचा समावेश आहे.
या निवडणुकीच्या रिंगणामध्ये पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 11 जण आहेत तर शिक्षक मतदारसंघासाठी 12 जण निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मतमोजणी करताना अत्यंत काळजीपूर्वक केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
मतमोजणीचीही तयारी पूर्ण
वायव्य पदवीधर व शिक्षक या दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी ज्योती कॉलेजमध्ये होणार आहे. त्याठिकाणी सर्व ती तयारी करण्यात आली आहे. कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याची सूचना केली आहे. मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. याचबरोबर शाईचे पेन, पाण्याची बॉटल नेण्यावरही निर्बंध घातल्याचे त्यांनी सांगितले.
उमेदवार किंवा एजंटांनी मतमोजणी केंद्रामध्ये मास्क बंधनकारक राहणार आहे. एजंट व उमेदवारांना नाष्टा व जेवणाची सोय केल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीला अतिरिक्त प्रादेशिक आयुक्त गीता कौलगी, अतिरिक्त प्रादेशिक आयुक्त नजमा पिरजादे, अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी आदी उपस्थित होते.
सोमवारी सुटी देण्याचा आदेश
कर्नाटक विधान परिषदेच्या वायव्य पदवीधर व वायव्य शिक्षकसह चार मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पदवीधर व शिक्षकांना सुटी देण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे.
कर्नाटक वायव्य पदवीधर मतदारसंघासाठी विजापूर, बागलकोट व बेळगाव जिल्हय़ात, दक्षिण पदवीधर मतदारसंघासाठी म्हैसूर, चामराजनगर, मंडय़ा, हासन जिल्हय़ात, वायव्य शिक्षक मतदारसंघासाठी विजापूर, बागलकोट व बेळगाव जिल्हय़ात, पश्चिम शिक्षक मतदारसंघासाठी धारवाड, हावेरी, गदग व कारवार जिल्हय़ात मतदान होणार आहे.
विधान परिषद मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील सरकारी व खासगी शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शिक्षण संस्था, सर्व शैक्षणिक संस्था, राज्य व केंद्र सरकारची कार्यालये, राष्ट्रीयीकृत व इतर बँका, केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारीतील कारखाने, इतर औद्योगिक संस्था, सहकारी संस्था, सर्व व्यावहारिक व औद्योगिक संस्थेत कायम व रोजंदारीवर काम करणारे पदवीधर व शिक्षकांना मतदान करता येईल, यासाठी दि. 13 जून रोजी विशेष सुटी मंजूर करण्याचा आदेश सरकारने दिला आहे.