ईटानगर येथे आयोजन
वृत्तसंस्था/ ईटानगर
भारतातील सीमावर्ती राज्य अरुणाचल प्रदेशमध्ये जी-20 अंतर्गत एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत भारताचा शेजारी देश आणि जी-20 चा सदस्य चीन मात्र सहभागी झाला नाही. अरुणाचल प्रदेशची राजधानी ईटानगरमध्ये ही बैठक पार पडली आहे. अरुणाचल प्रदेशात जी-20 बैठकीचे आयोजन झाल्याने चीनचा जळफळाट झाला असणार हे निश्चित आहे.
अरुणाचल प्रदेशवर स्वतःचा दावा सांगणाऱया चीनने या बैठकीपासून अंतर राखले आहे. चीनने बैठकीवरून भारतासमोर स्वतःचा आक्षेप नोंदविला आहे की नाही हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या मुद्दय़ावर चीन तसेच भारतीय विदेश मंत्रालयाने देखील कुठलीच टिप्पणी केलेली नाही.
वृत्तांकनाला नव्हती अनुमती
अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या या बैठकीला सरकारने गोपनीय घोषित केले होते. याचमुळे या बैठकीचे वृत्तांकन होऊ शकलेले नाही. या बैठकीचे आयोजन विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने ‘रिसर्च इनोव्हेशन इनिशिएटिव्ह, गॅदरिंग’ थीमवर केले होते. जी-20 बैठकीत सामील होण्यासाठी 50 हून अधिक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी शनिवारीच अरुणाचल प्रदेशात दाखल झाले होते. होल्लोंगी विमानतळावर उतरल्यावर हे प्रतिनिधी ईटानगर येथे पोहोचले, तेथे त्यांनी राज्यातील नवोन्मेषी उद्योजकांसोबत चर्चा केली आणि विविध समुदायांच्या कला आणि संस्कृतींबद्दल जाणून घेतले आहे.

थुप्टेन गटसेलिंग मठाला भेट
बैठक आटोपल्यावर आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी थुप्टेन गटसेलिंग मठात पोहोचले. त्यानंतर जवाहरलाल नेहरू राज्य संग्रहालयात त्यांना ईशान्येतील राज्याचा इतिहास आणि समृद्ध संस्कृतीविषयी माहिती देण्यात आली. जी-20 सदस्य देशांसोबत आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी या शिष्टमंडळात सामील होते. या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना केंद्र सरकार चीनच्या सीमेला लागून असलेल्या तवांग भागात नेण्याची योजना आखली असल्याचे समजते. अरुणाचल प्रदेशनंतर हे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आसाममध्ये पोहोचतील.
चीनचा बिनबुडाचा दावा
चीन अरुणाचल प्रदेशवर स्वतःचा दावा सांगतो. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा हिस्सा असल्याचे चीनचे म्हणणे आहे. चीनने ईटानगरमधील बैठकीसंबंधी अधिकृत स्वरुपात भारतासोबत आक्षेप नेंदविला आहे की नाही हे अद्याप समोर आलेले नाही. चीनने आतापर्यंत भारताच्या जी-20 अध्यक्षत्वाचे समर्थन केले आहे. तर चीनचे विदेशमंत्री किन गैंग यांनी चालू महिन्याच्या प्रारंभी विदेश मंत्र्यांच्या बैठकीत सामील होण्यासाठी भारताचा दौरा केला होता.
काश्मीरमध्येही बैठक
मे महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये संस्कृती विषयक जी-20 बैठकीचे आयोजन होणार आहे. श्रीनगरमध्ये प्रस्तावित या बैठकीचे आयोजन रोखण्यासाठी पाकिस्तान, तुर्किये अन् चीन प्रयत्न करत असल्याचे समजते. जम्मू-काश्मीरमध्ये जी-20 बैठक होऊ नये म्हणून पाकिस्तान जंग जंग पछाडत आहे.