चोर सोडून संन्याशाला फाशी : फिरते विपेत्यांवरही संशय : सोशल मीडियावरील पोस्टमुळे गोंधळ
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हय़ातील वेगवेगळय़ा गावात मुलांचे अपहरण करणाऱया टोळींचा वावर असल्याच्या अफवा पसरविण्यात येत आहेत. त्यामुळे फिरत्या विपेत्यांना अडवून त्यांना जाब विचारण्याचे प्रकार घडत असून रविवारी रामेश्वरला दर्शनासाठी निघालेल्या चार नागा साधूंना अडवून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
कौजलगी, ता. गोकाक येथे रविवारी मुलांचे अपहरणकर्ते असल्याच्या संशयाने चार साधूंना अडविण्यात आले. गावकऱयांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी स्वतः त्या साधूंनी आम्ही अपहरणकर्ते नाही. आम्ही साधू आहोत. हवे तर जवळच्या पोलीस स्थानकात आम्हाला न्या, अशी विनंती केली.
घटप्रभा पोलिसांनी चारही साधूंना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यांच्याजवळील ओळखपत्रांची पडताळणी केली.
ते उत्तरप्रदेशमधील अलीगढ व हाथरस जिल्हय़ातील राहणारे असल्याचे आढळून आले. दोन-तीन वर्षांतून एकदा रामेश्वरला दर्शनाला जाण्यासाठी ते बाहेर पडतात. यावेळीही याच कारणासाठी ते दक्षिणेत आले आहेत. मात्र, अपहरणकर्ते असल्याच्या संशयाने त्यांना अडवून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याच्या या प्रकारानंतर रामेश्वरचा दौरा अर्धवट सोडून उत्तरप्रदेशला परतण्याचा निर्णय या साधूंनी घेतला आहे.
कित्तूर तालुक्मयातील मरीगेरी येथे चादरी विकण्यासाठी आलेल्या दोघांना पकडून स्थानिक नागरिकांनी शनिवारी कित्तूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. एका शाळकरी मुलाचे अपहरण करण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचा गावकऱयांचा आरोप आहे. कित्तूर पोलिसांनी मध्यप्रदेशमधील कैलास कणीराम (वय 40), दौलतराम (वय 26) व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. या घटनेनंतर शनिवारी नंदगड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातही फिरत्या व्यापाऱयांवर संशय घेतल्याचे प्रकार घडले आहेत.
या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. मुलांचे अपहरण करणाऱया टोळय़ा कार्यरत असल्याच्या अफवा पसरविण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. कोणीही फिरते व्यापारी दिसले की मुलांचे अपहरण करणारा अपहरणकर्ताच आला असे समजून त्यांना हटकण्यात येत आहे. आपल्या मुलांना सांभाळा, असे आवाहन करणाऱया पोस्टमुळे पालक भयभीत झाले आहेत.
कित्तूर, कौजलगीपाठोपाठ अवरोळी येथेही झाडशहापूर येथील एका 60 वषीय वृद्धाला ताब्यात घेऊन गावकऱयांनी त्याची चौकशी केली आहे. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून चौकशीअंती तो मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ असल्याचे आढळून आले आहे. एक-दोन दिवसातच या अपहरणाच्या अफवांचे लोण सर्वत्र पसरले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका

यासंबंधी रविवारी रात्री जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. अनेक गावात मुलांचे अपहरण करणाऱया टोळय़ा सक्रिय असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. सोशल मीडियावर कसलीही खात्री न करता मेसेज पाठविले जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, फिरत्या विपेत्यांवर संशय घेतला जात आहे. अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्ती दिसल्यास जवळच्या पोलीस स्थानकाला किंवा 112 क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलीसप्रमुखांनी केले आहे. केवळ संकेश्वर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात एका मुलाचे अपहरण झाले होते. या प्रकरणी संशयितांना अटकही झाली आहे. हे प्रकरण वगळता कोणत्याही अपहरणाचा प्रकार घडला नसल्याचे पोलीसप्रमुखांनी स्पष्ट केले आहे.