कराड / प्रतिनिधी :
मोरणा-गुरेघर येथे शिवसेना माजी पदाधिकारी मदन कदम यांनी केलेल्या गोळीबारात दोघे ठार झाले. गावच्या सोसायटी निवडणुकीसाठी आलेल्या श्रीरंग लक्ष्मण जाधव यांच्यावर गोळीबार झाला. सोसायटी निवडणूक निकालाचा गुलाल अंगावर असलेल्या श्रीरंग जाधव यांचे शरीर अवघ्या काही तासात रक्ताने माखले.
मृत श्रीरंग जाधव हे शिवसेनेच्या अनेकांच्या चांगले संपर्कात होते. त्यांच्यावर गोळीबार झाल्याचे समजताच त्यांचा ठाण्यातील मित्रपरिवार सोमवारी सकाळी थेट कराडला उपजिल्हा रूग्णालयात पोहचला. श्रीरंग जाधव यांच्या अंगावरील गुलाल आणि त्यांचा निपचित मृतदेह पाहून मित्रपरिवाराला अक्षरशः रडू कोसळले. श्रीरंग जाधव यांचा ठाण्यात चांगला जनसंपर्क होता.
जीममधे नुकताच पुरस्कार
श्रीरंग जाधव हे व्यायामप्रेमी होते. ते ठाण्यात जीमला दैनंदिन जात होते. नुकताच त्यांना व्यायामात सातत्य ठेवून अपेक्षित यश मिळवल्याबद्दल त्यांचा सन्मान झाला होता. या सन्मानाचे व्हिडीओ शनिवारी श्रीरंग जाधव यांनी मित्रपरिवाराला सोशल मीडियावर पाठवले. हे व्हिडीओ पाहत, एकमेकाला दाखवत त्यांचा मित्रपरिवार उपजिल्हा रूग्णालयाच्या आवारात पाणावलेल्या डोळ्यांनी उभा होता.
जखमीच्या प्रकृतीची चौकशी
या गोळीबारात जखमी झालेल्या प्रकाश जाधव यांच्यावरही गोळीबार झाला आहे. त्यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी कृष्णा रूग्णालयात गर्दी झाली होती.