अभिजीत खांडेकर : तरूण भारत
शेवगा ही वनस्पती सर्वांच्याच ओळखीची आहे. ती आपल्या आसपासच्या परिसरात नक्कीच बगायला मिळते. पुर्वी ती प्रत्येकाच्या परसबागेत हमखास दिसत असे. आपल्या पुर्वजांनी या वनस्पतीचे महत्व अगोदरच ओळखले होतं. त्यामुळे ग्रामिण भागात शेवगा हा परसबागेत, शेताला जाणाऱ्या पायवाटेवर किंवा बांधावर लावलेला पहायला मिळतो.
शेवग्याला शास्त्रीय भाषेत मोरिंगा ओलिफेरा असे म्हणतात. भारतात तसेच आशिया आणि आफ्रिकेसारख्या इतर उष्णकटिबंधीय क्षेत्रात देखिल ही वनस्पती आढळ्ते. भारतातील लोक शतकानुशतके या वनस्पतीची पाने, फुले, बिया आणि मुळे औषधासाठी वापरत आली आहेत.

शेवग्याचे महत्व आयुर्वेदामध्ये सांगितले गेल्याने ते युगानुयुगे वापरले जात आहे. ही एक सर्वसमावेशक औषधी वनस्पती असून तिच्यामध्ये प्रतिजैविक, वेदनाशामक, अँटीऑक्सिडंट, दाहक-विरोधी, कर्करोगविरोधी, मधुमेहविरोधी, विषाणूविरोधी, अँटीफंगल आणि अँटीएजिंग गुणधर्म आहेत.

शेवग्याच्या झाडापासून आपल्य़ाला अनेक फायदे मिळतात. तो एक कल्पवृक्ष म्हणून देखिल ओळखला जातो. या झाडाच्या शेंगा, पाने, साली, डिंक, याच्यामधील औषधी गुणधर्मामुळे शेवगा बहूपयोगी ठरतो.

फार पूर्वी पासून पावसाळ्याच्या सुरवातीलाच म्हणजे मृग नक्षत्रात शेवग्याच्या पानांची भाजी करून खाल्ली जाते. याला शास्त्रीय कारण आहे. पावसाळा सुरू झाल्यावर पाणी काहीस गढूळ होतं. अशा गढूळ पाण्यामुळे रोगराई पसरली जाते. त्यामुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. ती वाढण्यासाठी शेवग्याच्या पानांची भाजी उपयोगी पडते.
शेवग्याच्या पानांमध्ये तसेच फूलांमध्ये अॅन्टीबॅक्टेरियल घटक असल्याने अनेक प्रकारचे संसर्ग थोपवण्यासाठी मदत होते. शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात आढळते. ती शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते.
शेवग्याच्या पानांमध्ये महत्त्वाची जीवनसत्त्वे, भरपूर प्रथिने, आणि पोषणमूल्यांमुळे असल्याने याचे महत्व आयुर्वेदात सांगितले आहे. स्तनदा मातांनी आपल्या आहारात शेवग्याचा वापर करावा. यामुळे स्तनदा मातांचे दूध वाढण्यास मदत होते. याच्या सेवनाने आई व बाळ दोघांनाही फायदा होतो.
शेवग्याच्या पानांमध्ये आणि शेंगांमध्ये बी कॉम्पलॅक्स हे औषधी घटक मुबलक असल्याने त्यामुळे पचनक्रिया सुधारते. कार्बोहायाड्रेट्सचे विघटन सुकर होते तसेच प्रोटीन आणि फॅट्सचा शरीराला फायदा हो

.
शेवगाच्या शेंगा शरीरातील फ्री रॅडीकल्सचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. शेंगांमधील मुबलक व्हिटामिन्समुळे वजन कमी करण्यास तसेच चयापचय सुधारण्यास देखील मदत करते. पोटाच्या तक्रारी कमी होऊन पचनकार्य सुधारते.

तसेच रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवून रक्त शुद्ध करण्यास मदत करते. शेवग्याच्या शेंगामुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलवर चांगले नियंत्रण मिळवता येते. तसेच साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. शेवग्याच्या नियमित सेवनाने मधुमेह, सांधे दुखी, कर्करोग, हृदयाचे आरोग्य यावर नियंत्रण मिळवता येते.

याच्या शेंगा यकृत आणि मूत्रपिंडाच्या डिटॉक्सिफिकेशनसाठी देखील चांगली मदत करते. तसेच रक्त शुद्ध करून त्वचेचे आजार बरे करते त्यामुळे त्वचा टवटवीत होते. शेवग्याच्या पानांची पूड सौंदर्यप्रसाधन म्हणून वापरली जाते.
शेवग्याचा डींक हा डोकेदुखीवर अत्यंत प्रभावी ठरतो. शेवग्यच्या जाडसर सालीत येणारा पांढरा शुभ्र डिंक दुधात वाटून त्याचा लेप मस्तकावर लावाल्यास वेदना कमी होतात.