वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरच्या खोंगजोम येथील सपम मयाई लीकाईमध्ये एका सामूहिक भवनात आयईडी स्फोट झाला आहे. या स्फोटात एका बंगाली मजुराला जीव गमवावा लागला तर 4 जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या थौबल रुग्णालयात हलविण्यात आले आहे. फोरेन्सिक पथकाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली आहे. पोलिसांनी संबंधित परिसरावर नियंत्रण मिळवत तपासास सुरुवात केली आहे. पोलिसांनुसार हा आयईडी स्फोट सोमवारी सकाळी घडला आहे. स्फोटावेळी मजूर झोपेत होते असे सांगण्यात आले. थोबल जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना पंकज महतो यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मजूर सामूहिक भवनाच्या पाण्याच्या टाकीचे काम करण्यासाठी तेथे पोहोचले होते. या स्फोटामागे कुणाचा हात आहे हे अद्याप समोर आलेले नाही. तसेच कुठल्याही संघटनेने याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.