प्रतिनिधी/ बेळगाव
हरेकृष्णचा गजर, सजविण्यात आलेल्या बैलगाड्या, सजीव देखावे व भक्तीरसात न्हाऊन निघालेले भाविक अशा मंगलमय वातावरणात इस्कॉनची रथयात्रा झाली. शहराच्या प्रमुख मार्गांवरून रथयात्रा काढण्यात आली. मागील दोन वर्षात रथयात्रेवर निर्बंध होते. त्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहात भाविक सहभागी झाले होते.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातून रथयात्रेला सुरुवात झाली. इस्कॉनचे बेळगाव प्रमुख भक्तीरसामृत महाराज, रामगोविंद स्वामी महाराज, लोकनाथ महाराज व चंद्रमौली महाराजांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कर्नाटक सरकारचे दिल्लीतील माजी विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील, आमदार अनिल बेनके, श्रीराम सेनेचे प्रमुख रमाकांत कोंडुसकर यांच्या उपस्थितीत रथयात्रेचे उद्घाटन झाले. यावर्षी रथयात्रेचे 25 वे वर्ष असल्याने भव्य स्वरुपात रथयात्रा काढण्यात आली. सुरुवातीला हंदिगनूर येथील भजनी मंडळ सहभागी झाले होते. कालियामर्दन, नृसिंह अवतार, श्रीकृष्ण लीला दर्शविणारे देखावे तयार करण्यात आले होते. याच बरोबर आकर्षक पद्धतीने सजविण्यात आलेल्या 20 हून अधिक बैलगाड्या लक्षवेधी ठरत होत्या.

रथ ओढण्यासाठी महिला तसेच पुरुष भाविकांची मोठी गर्दी झाली होती. केवळ देशातीलच नाही तर परदेशी इस्कॉन भक्त रथयात्रेत सहभागी झाले होते. जगन्नाथ, बलराम व सुभद्रा यांच्या मूर्तींना फुलांनी आकर्षकरीत्या सजविण्यात आले होते. रथयात्रेच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी रथयात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. ‘हरिबोल’च्या भजनांवर हजारो भाविक ताल धरत होते.
धर्मवीर संभाजी चौक येथून सुरू झालेली रथयात्रा कॉलेज रोड, समादेवी गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, कपिलेश्वर ओव्हरब्रिज, एसपीएम रोड, नाथ पै सर्कल, गोवावेस येथून शुक्रवारपेठ टिळकवाडी येथील श्री श्री राधाकृष्ण गोकुळानंद मंदिरात रथयात्रेची सांगता झाली. पुढील दोन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ठिकठिकाणी सरबत-फळांचे वाटप
रथयात्रेच्या मार्गावर अनेक भाविकांनी आपल्याला शक्य ती सेवा करण्याचा प्रयत्न केला. दुपारच्या उन्हामध्ये भाविकांना तहान लागत असल्यामुळे पिण्याचे पाणी, सरबत, ड्रायफ्रुट, फळे यांचे वाटप करण्यात आले. शहरासोबतच शहापूर परिसरात अनेक भाविकांनी साहित्याचे वाटप केले. प्रत्येक भाविक नेमून देण्यात आलेल्या सेवेत दंग होता.