वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांनी विराट कोहलीच्या कामगिरीचे खास कौतुक केले आहे. भारतीय संघातील तो सध्याच्या युगातील परिपूर्ण फलंदाज असून नुकत्याच झालेल्या पाकविरुद्धच्या सामन्यातील त्याची फलंदाजी म्हणजे भारतीय क्रिकेट क्षेत्राला कोहलीच्या रुपात लाभलेली दैवी देणगीच म्हणावी लागेल, असे प्रतिपादन ग्रेग चॅपेल यांनी केले आहे.
अलीकडेच झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतील आपले 71 वे शतक झळकविले. या कामगिरीनंतर तो आणखी नवे विक्रम करण्यासाठी सज्ज झाला आहे. मध्यंतरी त्याच्या खराब फॉर्मबद्दल टीकाकारांनी त्याच्यावर तोंडसुख घेतले. विराटने त्याकडे दुर्लक्ष केले. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकविरुद्धच्या सामन्यातील केलेल्या खेळीनंतर विराटने टीकाकारांची तोंडे आपोआप बंद केली असेही चॅपेल यांनी म्हटले आहे. भारतीय क्रिकेट क्षेत्रातील विराट कोहली हा सध्याच्या युगातील माझ्या मते परिपूर्ण फलंदाज असल्याचे चॅपेल यांनी म्हटले आहे.