कोल्हापूर समाज कल्याण विभागाचे पथदर्शे पाऊल; कंत्राटी तत्वावर दोन जागा भरणार; राज्यातील पहिलाच प्रयोग
प्रवीण देसाई / कोल्हापूर
तृतीयपंथीयांचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग कार्यालयाकडून तृतीयपंथीयांना नोकरीची संधी दिली जाणार आहे. हे पथदर्शी पाऊल असून राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. याचे अनुकरण इतर शासकीय विभागांनी करायला हरकत नाही. तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरु असलेल्या चळवळीला यामुळे नक्कीच बळ मिळू शकेल.

समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असणारा घटक म्हणून तृतीयपंथियांकडे पाहीले जाते. त्यांना ही सर्वसामान्यांमध्ये मिसळण्याचा व मुख्य प्रवाहात येण्याचा अधिकार आहे. यासाठी समाज कल्याण विभागाकडून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लेंढे यांनीही आपल्याच कार्यालयात दोन तृतीयपंथीयांना मदतनीस म्हणून नोकरी देण्याचा निर्णय घेऊन पथदर्शी पाऊल उचलले आहे. राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. ‘कोल्हापूरात जे होते ते राज्यात घडते’ हे अनेक गोष्टींवरुन सिध्द झाले आहे. कोल्हापूरचे टोलमाफीचे आंदोलन असो किंवा हेरवाडचा विधवाप्रथा बंदीचा पॅटर्न असो, ही प्रातिनिधीक उदाहरणे म्हणता येतील.
सध्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अंकुशराव लांडगे शैक्षणिक, सामाजिक ट्रस्ट, भोसरी, जि. पुणे यांना तृतीयपंथीयांच्या सर्व्हेक्षण व अभ्यासाचे काम देण्यात आले आहे. यामध्ये त्यांच्यावर तृतीयपंथीयांची कार्यशाळा घेणे, त्यांचे प्रबोधन करणे, तृतीयपंथीयांच्या ओळखपत्रासाठी ऑनलाईन फॉर्म भरुन देणे आदींची जबाबदारी आहे. या सर्वावर समाजकल्याण विभागाचे नियंत्रण आहे. यातील डाट्रा एंट्रीसह विविध कामांसाठी दोन मदतनीसांना कंत्राटी तत्वावर नोकरी दिली जाणार आहे. या उपक्रमाचे संकल्पक विशाल लोंढे यांनी आपल्याच विभागातून तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
नोकरीसाठी 15 दिवसात अर्ज सादर करण्याचे आवाहन
समाज कल्याण विभागात दोन पदांसाठी कंत्राटी तत्वावर तृतीयपंथीयांना नोकरी दिली जाणार आहे. यासाठी अर्ज स्विकारण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधित संबंधितांनी अर्ज समाज कल्याण विभागाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समाजकल्याण विभागात कंत्राटी तत्वावर दोन तृतीयपंथियांना नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तृतीयपंथीयांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी स्वतःच्या कार्यालयापासूनच सुरुवात केली आहे.
विशाल लोंढे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, कोल्हापूर